मुंबई : दक्षिण आफ्रिकेतल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय संघाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. आजवरच्या इतिहासात भारताने चारवेळा अंडर-19 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. यंदाच्या विश्वचषकात बांगलादेशच्या तुलनेत भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रियम गर्गची युवा ब्रिगेड अंडर-19 विश्वचषकावर पाचव्यांदा भारताचं नाव कोरेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
भारताची युवा ब्रिगेड 2000, 2008, 2012, 2018 आणि आता 2018 पाचव्या विश्वविजेतेपदासाठी सज्ज झाली आहे. पाकिस्तानचा धुव्वा उडवून भारताने सलग तिसऱ्यांदा अंडर-19 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. आता या युवा शिलेदारांचा सामना पहिल्यांदाच फायनल गाठलेल्या बांगलादेशशी होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ सुपर फॉर्मात आहे. आतापर्यंत झालेल्या साखळी आणि बाद फेरीच्या पाचही सामन्यात भारताने प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही त्याच आत्मविश्वासाने सामोरं जाण्याचा युवा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.
विश्वचषकातल्या सुपर फॉर्ममागे मुंबई आणि महाराष्ट्राचे चार शिलेदार
भारतीय संघाच्या या विश्वचषकातल्या सुपर फॉर्ममागे मुंबई आणि महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. यशस्वी जैस्वाल, दिव्यांश सक्सेना, अथर्व अंकोलेकर या मुंबईकरांसह महाराष्ट्राच्या सिद्धेश वीरची कामगिरी हे भारताच्या यशाचं गमक म्हणावं लागेल. यशस्वीनं या स्पर्धेत एक शतक आणि तीन अर्धशतकांसह सर्वाधिक 312 धावांचा रतीब घातला आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याची शतकी खेळी ही अंडर-19 विश्वचषकात भारतीय फलंदाजानं केलेल्या सर्वोत्तम खेळीपैकी एक ठरावी.
दिव्य़ांशनही पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक ठोकून यशस्वीसोबत अभेद्य भागीदारी साकारली होती. डावखुरा फिरकी गोलंदाज अथर्व अंकोलेकरनं फलंदाजीतही आपली कमाल दाखवून दिली. उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियावरच्या विजयात अथर्वची अर्धशतकी खेळी मोलाची ठरली होती. महाराष्ट्राच्या सिद्धेश वीरनंही त्या सामन्यात उपयुक्त योगदान दिलं होतं. या चार शिलेदारांसह लेग स्पिनर रवी बिश्नोई, कार्तिक त्यागी आणि सुशांत शर्मा या भारतीय आक्रमणानं संपूर्ण स्पर्धेत चांगलाच दबदबा राखला.
विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासात भारताच्या कामगिरीचा आलेख हा नेहमीच चढत्या भाजणीचा राहिलाय. 2000 साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा युवा विश्वचषक पटकावला. त्यानंतर विराट कोहली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं भारताला विश्वचषकाचा मान मिळवून दिला. आता प्रियम गर्गची युवा ब्रिगेड पाचव्यांदा तो पराक्रम गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. पोचेफस्ट्रमच्या मैदानात तसं झालं तर तो एक नवा इतिहास ठरेल.