कोकणातील दशावतारी लोककलेतील प्रख्यात कलावंत सुधीर कलिंगण (वय 53) यांचे आज पहाटे निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना गोव्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथेच उपचारांदरम्यान आज पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधानामुळे लोककला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर निधनावर कोकणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुधीर कलिंगण यांच्या अकाली निधनामुळे दशावतारी कलेची मोठी हानी झाली असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.


दशावतारी नाट्य मंडळांमधील श्री कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळाचे सुधीर कलिंगण हे मालक होते. दिवंगत दशावतारी कलाकार बाबी कलिंगण यांचे ते पुत्र होते. पारंपारिक दशावतारी कलेला आधुनिकतेचा साज देते नवनवीन नाट्यप्रयोग सादर करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी दशावतारी राजा म्हणून साकारलेल्या अनेक भूमिका नावाजल्या आणि गाजल्याही. कोकणात दशावतारातील लोकराजा म्हणून त्यांची ओळख होती. त्याचप्रमाणे दशावतार कला साता समुद्रापार पोहोचविण्यात सुधीर कलिंगण यांचा मोठा वाटा आहे. कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील रहिवासी व प्रसिद्ध दशावतार कलाकार सुधीर कलिंगण यांच्या निधनाने सिंधुदूर्ग जिल्ह्यासह कोकणात शोककळा पसरली आहे.


सुधीर कलिंगण यांनी दशावतार लोककलेत राजा, स्त्री वेशातील भूमिका तसेच अनेक वेगवेगळ्या भूमिका सुद्धा त्यांनी दशावतार लोककलेत अजरामर केल्या. त्यामुळेच त्यांना रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेत 'लोकराजा' ही पदवी बहाल केली गेली. त्यांनी केलेल्या अनेक भूमिका रसिक प्रेक्षकांच्या कायमच आठवणीत राहतील अश्याच आहेत. वेळा चंदनासारखी त्यानी वठवलेली भूमिका प्रेक्षकांना अक्षरशः रडायला लावायची. त्यासोबतच त्यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका वटवून त्या भूमिकांना न्याय देण्याचं काम केलं. कोकणात कुठेही सुधीर कलिंगण यांचं नाटकाचा प्रयोग असला तरी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळायचा. 


सुधीर कलिंगण यांनी दशावतार लोककलेत स्त्री भूमीकेला आपल्या लोककलेतून न्याय दिला. दशावतार लोककलेतील कुठलीही भूमिका वटवत असताना त्यासाठी केली जाणारी वेशभूषा आणि चेहऱ्यावरील मेकअप हे सर्व काही तो कलाकारच करत असतो. सुधीर कलिंगण यांनी स्त्री भूमिकेसाठी स्वतः साडी नेसून ती भूमिका वटवली त्यांना त्या वेशात पाहिल्यानंतर काही काळ संभ्रम व्हायचा एवढा हुबेहूब पेहराव ते करायचे. लोककलेत नाट्यप्रयोग सादर करत असताना स्पष्ट उच्चार, संस्कृत भाषेतील प्रभुत्व, प्रयोगावेळी संवादात केली जाणारी शब्दफेक आणि एकूणच पेहराव यामुळेच नाट्यरसिकांना कायमच त्यांच्या भूमिकांत आकर्षण असायचं. त्यांनी नाट्य प्रयोगात संस्कृत भाषेत संवाद करत नाट्य रसिकांना खिळवत ठेवलं. 


कोकणातील दशावतार लोककला आठशे वर्षांपेक्षा जास्त काळापासून जपली जात आहे. बाबी कलिंगण, बाबी नालंग यासारखे सुप्रसिद्ध दशावतार कलाकार होऊन गेले, ज्यानी त्याकाळी दळणवळणाची साधने नसताना डोक्यावर बोजा घेऊन गावोगावी चालत जात दशावतार लोककला सादर करून आपलं उदरनिर्वाहाचं साधन बनवत ही दशावतार लोककला जपली आणि वाढवली. म्हणूनच दशावतारातील राजाला "रात्री राजा' आणि दिवसा डोक्यावर बोजा" अशी उपमा दिली जायची. काळाच्या ओघात आधुनिकीकरणात दशावतार लोककलेत अनेक बदल होत गेले आणि ही दशावतार लोककला अधिक वृद्धिंगत होत गेली.