पत्नीची छेड काढल्याने तरुणाची हत्या, कोल्हापुरात पतीचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 02 Dec 2017 06:56 PM (IST)
समीर मुजावर आपल्या पत्नीची वारंवार छेड काढत असल्याचा दावा आरोपी पती अनिल धावरेने केला आहे.
मयत समीर मुजावर
कोल्हापूर : पत्नीची छेड काढल्याच्या रागातून कोल्हापुरात पतीने एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. समीर बाबासो मुजावर असं मृत तरुणाचं नाव आहे. शनिवारी सकाळी कोल्हापुरातल्या बागल चौकात ही घटना घडली. मयत समीर मुजावर आपल्या पत्नीची वारंवार छेड काढत असल्याचा दावा आरोपी पती अनिल धावरेने केला आहे. समीर आणि अनिल यांच्यात बागल चौकात जोरदार वाद झाला. वादाचं रुपांतर अखेर हाणामारीत झालं. त्यावेळी अनिलने समीरवर चाकूनं वार करुन त्याला गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. उपचारासाठी समीरला सीपीआर रुग्णालयात दाखल केलं असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी संशयित आरोपी अनिल धावरेला ताब्यात घेतलं आहे.