CRPF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, दोघे गंभीर जखमी
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2018 10:58 AM (IST)
या गोळीबारात दोन्ही जवान गंभीर जखमी झाले आहेत.
गडचिरोली: सीआरपीएफच्या जवानाने आपल्याच दोन सहकारी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन्ही जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र प्राथमिक उपचारानंतर जखमींना आधी चंद्रपूरला हलविण्यात आले, मग त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पहाटे 3 वाजता नागपूरला हलविण्यात आले आहे. एटापल्ली इथं तैनात असलेल्या 191 बटालियनच्या संजय शेंद्रे या जवानाने हा गोळीबार केला. यामध्ये शंकपाल विलासमूर्ती आणि एस एच इंगळे हे जखमी झाले आहेत. काल रात्री 11 ते 12 च्या दरम्यान ही थरारक घटना घडली. एच.एस.इंगळे यांच्या पोटात, तर शंकपाल यांच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. गोळीबार केलेला जवान गोळी मारुन फरार झाला होता, मात्र त्याला नंतर पकडण्यात आले. हा गोळीबार का केला, याबाबतचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, या प्रकारानंतर सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी पोहचले असून तपास सुरु आहे.