कोल्हा'पुरात' अडकलेल्या तीन माकडांची 15 दिवसांनी थरारक सुटका
एबीपी माझा वेब टीम | 28 Jul 2017 08:24 AM (IST)
कोल्हापूरमध्ये नदीला आलेल्या पुरामुळे झाडावर अडकलेल्या तीन माकडांची 15 दिवसांनी व्हाईट आर्मीने सुटका केली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पुरात अडकलेल्या माकडांची तब्बल 15 दिवसांनंतर सुटका करण्यात आली आहे. गिर्यारोहक विनोद कंबोज आणि व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी माकडांच्या सुटकेसाठी विशेष रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. या माकडांची सुटका होताच त्यांची वाट पाहणाऱ्या इतर माकडांनी चक्क मिठ्या मारल्या. धो-धो कोसळणारा पाऊस आणि खाली पुराचं पाणी अशा दुहेरी संकटात तीन माकडं कोल्हापुरातील पोर्ले गावातल्या एका झाडावर अडकली होती. दोरखंडाच्या सहाय्यानं या माकडांना बाहेर काढण्यात यश आलं. जवळपास दोन तास हे माकडांच्या सुटकेसाठी थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं. दोरखंडाला पाच फुटांवर केळी आणि भुईमुगाच्या शेंगा बांधण्यात आल्या. या माकडांनी केळाच्या आमिषाने दोरखंडाजवळ यावं, त्यानंतर दोरखंडाच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचा प्लॅन होता. एखादं माकड चुकून पाण्यात पडलं, तर त्याला वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यात बोटही तैनात करण्यात आली होती. तासाभरानंतर एक माकड दोरखंडावर चढलं. त्याने केळी खातच दोरखंडाचा अंदाज घेतला आणि क्षणाचाही विचार न करता दोरीच्या सहाय्याने किनाऱ्याच्या बाजूच्या झाडावर उडी मारली. पहिल्या माकडाचे धाडस झाडावरील दोन्ही माकडं पाहत होतीत. पहिलं माकड किनाऱ्यावर पोहचलेलं बघताच दुसऱ्या माकडाने हे धाडस करायचं ठरवलं आणि त्यानंही दोरीच्या सहाय्याने नदी पार केली. ही सगळी कसरत तिसरं माकडं बघत होत. या माकडानेही दोरीच्या सहाय्याने पूर पार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचं धाडस होईना म्हणून ते मागे फिरुन परत आलं. यावेळी काठावर बसलेल्या माकडांनी प्रोत्साहन देत ओरडायला सुरुवात केली. एका माकडाने चक्क त्याला दोरीवर कसं लटकायचं याचं जणू प्रात्यक्षिकच करुन दाखवलं. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हे माकड दोरखंडाच्या सहाय्याने काठावर आलं. काठावर माकड येताच इतर माकडांनी त्याला मिठीच मारली. काठावर ठेवलेल्या शेंगा आणि केळ्यांवर या माकडांनी फडशा पाडला.