झोपण्याच्या जागेवरुन हाणामारी, आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 11 Jan 2018 11:48 AM (IST)
कोल्हापूरजवळील रजपूतवाडी इथल्या आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली.
प्रातिनिधीक फोटो
कोल्हापूर: झोपण्याच्या जागेवरुन वाद होऊन, झालेल्या मारहाणीत आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. कोल्हापूरजवळील रजपूतवाडी इथल्या माध्यमिक आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली. शंकर सावळाराम झोरे, असं मृत्यू झालेल्या 16 वर्षीय मुलाचं नाव आहे. तो शाहूवाडी तालुक्यातील आंबाईवाडा इथला रहिवासी होती. या धक्कादायक प्रकारामुळे रजपूतवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. रजपूतवाडी इथल्या माध्यमिक आश्रमशाळेत राज्यातील अनेक भागातील मुले आहेत. त्यांना झोपण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. काल रात्री झोपण्याच्या जागेवरुन विद्यार्थ्यांची हाणामारी झाली. या हाणामारीत शंकरला दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला. त्याला आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी करवीर पोलीस अधिक तपास करत आहेत.