औरंगाबाद : औरंगाबादमधील व्हिडीओकॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 12 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. कंपनीतील हजारो कर्मचारी 8 जानेवारीपासून सक्तीच्या रजेवर गेले आहेत.


रजा नेमकी कशासाठी दिली याची अधिकृत माहिती कंपनी व्यवस्थापनाने न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि शंकेचं वातावरण निर्माण झालं आहे.

औरंगाबादमध्ये व्हिडीओकॉनचं  मोठं युनिट आहे. यात फ्रीज, वॉशिंग मशिन, मोबाईल, एसी आणि इतर घरगुती उपकरणांची निर्मिती केली जाते.

दरम्यान, औरंगाबादमधील कंपनीच्या युनिटमध्ये 6 हजार 459 कर्मचारी कार्यरत आहेत. व्हिडीओकॉनकडे तब्बल 45 हजार कोटी बँकेचे थकित असल्यातं समजतं.

व्हिडीओकॉन : विद्युत उपकरणातील मोठं नाव
विद्युत उपकरणातील एक अग्रगण्य कंपनी आहे. 1955 साली नंदलाल धूत यांनी एक साखरकारखाना उभारुन उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे 1986 ला नंदलाल यांच्या वेणुगोपाल, राजकुमार आणि प्रदीपकुमार यांनी 'अधिगम ट्रेडिंग फर्म' नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीत पेपर ट्यूब (कागदी) तयार केल्या जात होत्या. पुढे या कंपनीचा विस्तार करुन टीव्ही आणि वॉशिंग मशिन तयार करु लागले. ही कंपनी नावारुपाला आली ती  एसी, फ्रीज आणि घरगुती उपकरणे तयार करु लागले. फेब्रुवारी 1991 'अधिगम' हे नाव बदलून 'व्हिडीओकॉन' करण्यात आलं आणि घराघरात पोहोचलं.