मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सकाळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अवघ्या 10 ते 15 मिनिटांची ही भेट होती. भेटीचं कारण अस्पष्ट असलं तरी या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चंद्रकांत पाटील कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संभाजी भिडे काल दुपारी तिथे आले होते. मात्र पाटील यांना येण्यास उशिर झाल्याने संभाजी भिडे सांगलीला परतले. परंतु आज सकाळी सव्वादहा वाजता संभाजी भिडे सांगलीहून कोल्हापूरला आले आणि चंद्रकांत पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीचा नेमका तपशील कळू शकलेला नसला तरी ही खासगी भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.