सांगली : सांगली जिल्ह्यात निसर्गाचा सुरु असताना, बचावकार्यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी खासगी बोट उलटल्याने 16 जणांचा बुडाले असून 12 जणांचे मृतदेह हातील लागले आहेत. पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने बोट पलटी झाल्याचं कळतं. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, दोन लहान मुलांचा समावेश आहे. इतर बेपत्ता पूरग्रस्तांचा शोध सुरु आहे. मात्र प्रशासनाने अद्याप मृतांच्या आकडेवारीला दुजोरा दिलेला नाही.


मुसळधार पावसामुळे सांगलीतील कृष्णा नदीला महापूर आला आहे. सांगली जिल्हा चोहोबाजूंनी पाण्याने वेढला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफसह नौदलाच्या बोटी कार्यरत आहेत. अशाच अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी गेलेली एक खासगी बोट उलटली. या बोटीत 25 ते 30 जण बसले होते. परंतु पाण्याच्या प्रवाहाने बोट उलटली, त्यापैकी 16 जण बुडाले आहेत.

एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून जवान बुडालेल्यांचा शोध घेत आहेत. ही बोट ग्रामपंचायतीची असल्याचं कळतं. बोटीत बसलेल्या कोणीही लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं.

दरम्यान, सांगलीमधील बोट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. हवामान अनुकूल नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली दौरा रद्द झाला आहे.

बोट दुर्घटनेमध्ये मयतांची नावं
१) मयत एक लहान मुल
२) कल्पना रवींद्र कारंडे
३) कस्तुरी बाळासो वडेर
४) पप्पू ताई भाऊसो पाटील
५) लक्ष्मी जयपाल वडेर
६) राजमाती जयपाल चौगुले
७) बाबासो अण्णासो पाटील
८) अनोळखी इसम

न सापडलेली व्यक्ती
१) पिल्लू तानाजी गडदे




सांगली शहर आणि परिसरात पुराची भीषण
सांगली शहर आणि परिसरात अजूनही पुराची स्थिती भीषण आहे. हजारो घरं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं मोठं आव्हान प्रशासनसमोर आहे. तीन दिवसांपासून सांगतील पूर असल्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत. पुरामुळे अद्यापही हजारो लोक घरात अडकून पडले आहेत. त्यांच्यापर्यंत मदतकार्य पोहोचत नाही. घरात वीज नाही, भाजीपाला किंवा दूध नाही. अशा स्थितीत जीव मुठीत घेऊन लोक जगत आहेत. तीन दिवसांपासून ही स्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराची पाहणी करणार आहेत.

सांगलीवाडीला पुराच्या पाण्याने वेढा घातला
सांगलीत कृष्णा नदीच्या काठावरच असलेल्या सांगलीवाडीला पुराच्या पाण्यानं वेढा घातला आहे. गावात शेकडो लोक अडकल्याची शक्यता आहे. सांगली शहरातील राणा प्रताप चौक, कॉलेज कॉर्नर परिसरात कमरेएवढं पाणी साचलं आहे. शिवाय तिकडे भिलवडी आणि आजूबाजूची गावं पाण्यात अडकली आहेत. तिकडे जवळपास 300 ते 500 लोक अडकल्याची शक्यता आहे. NDRFच्या टीमला देखील मदतकार्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळत आहे. बाभळीचे काटे आणि पाण्याखाली अडथळ्यांमुळे NDRFच्या बोटी पंक्चर होत आहेत. त्यामुळे पत्र्याच्या नेव्ही बोट्सची मागणी होत आहे.