सातारा : सांगली, कोल्हापूर, साताऱ्यात  पुराची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे हाल सुरु आहेत. नागरिकांसोबत या मार्गावर अडकलेल्या ट्रक चालक आणि क्लिनर लोकांची देखील आबाळ सुरु आहे.


पुणे बेंगलोर महामार्गावरील कराडच्या पुढची वाहतूक पुर्णता थांबल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा दिसत असताना साताऱ्यातील शिरवळ या ठिकाणी जवळपास 3 हजार ट्रक रस्त्याच्या कडेला उभे केले आहेत. हे ट्रक गेले चार दिवसांपासून या ठिकाणी उभे आहेत. यातील बहुतांशी चालक आणि क्लिनर हे  केरळ, तामिळनाडू, कर्नाटकचे आहेत. लांब पल्याच्या गाड्या घेऊन मुंबई आणि पुण्याकडे निघालेले हे चालक पुरामुळे अडकले आहेत.

या रस्त्यात थांबवलेल्या ट्रकचे चालक आणि क्लिनर लोकांची यामुळे दैना अवस्था झाली आहे.  यांना जेवण आणि पिण्याचे पाणी देखील मिळत नाहीये. जेवणाची कुठलीही सोय नसल्याचे भात शिजवून पाण्यासोबत खावे लागत असल्याचे भीषण चित्र आहे.



मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि कोयना नद्यांना महापूर आला आहे.  त्यामुळे पुणे कोल्हापूर बंगळूरू हा हायवे बंद झाला आहे.  हा हायवे कायम अतिशय व्यस्त असतो. मात्र आता पुरामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यात हजारो ट्रक अडकले आहेत. दररोज हजारो ट्रक या मार्गावरून ये जा करतात. तर यातून कोट्यवधींच्या मालाची वाहतूक होत असते. या अनेक ट्रक्समध्ये नाशवंत माल असल्याने पाणी कमी झालं नाही तर हा माल खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठं नुकसान होईल, असं ट्रकचालकांनी सांगितलं आहे.

सांगली, कोल्हापुरात पुराची स्थिती भीषणच, अजूनही हजारो लोक अडकलेलेच

कोल्हापूर आणि सांगलीत पूर परिस्थिती भीषण झाली असून अद्यापही हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. अनेक नागरिकांना वेळेवर मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात असून आता पुराच्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती देखील व्यक्त केली जाऊ लागली आहे.

सांगली शहर आणि परिसरात पुराची भीषण
सांगली शहर आणि परिसरात अजूनही पुराची स्थिती भीषण आहे. हजारो घरं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं मोठं आव्हान प्रशासनसमोर आहे. तीन दिवसांपासून सांगतील पूर असल्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत. पुरामुळे अद्यापही हजारो लोक घरात अडकून पडले आहेत. त्यांच्यापर्यंत मदतकार्य पोहोचत नाही. घरात वीज नाही, भाजीपाला किंवा दूध नाही. अशा स्थितीत जीव मुठीत घेऊन लोक जगत आहेत. तीन दिवसांपासून ही स्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराची पाहणी करणार आहेत.

सांगलीवाडीला पुराच्या पाण्यानं वेढा घातला
सांगलीत कृष्णा नदीच्या काठावरच असलेल्या सांगलीवाडीला पुराच्या पाण्यानं वेढा घातला आहे. गावात शेकडो लोक अडकल्याची शक्यता आहे. सांगली शहरातील राणा प्रताप चौक, कॉलेज कॉर्नर परिसरात कमरेएवढं पाणी साचलं आहे. शिवाय तिकडे भिलवडी आणि आजूबाजूची गावं पाण्यात अडकली आहेत. तिकडे जवळपास 300 ते 500 लोक अडकल्याची शक्यता आहे. NDRFच्या टीमला देखील मदतकार्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळत आहे. बाभळीचे काटे आणि पाण्याखाली अडथळ्यांमुळे NDRFच्या बोटी पंक्चर होत आहेत. त्यामुळे पत्र्याच्या नेव्ही बोट्सची मागणी होत आहे.

जिल्हा कारागृहात पाणी
सांगली शहराप्रमाणेच जिल्हा कारागृहात पाणी शिरलं आहे. त्यामुळे जवळपास 340 कैदी कारागृहात अडकले आहेत. कैद्यांना बाहेर काढण्यासाठी जेल प्रशासनानं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडे मागणी केली आहे. तर, सांगलीचं जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयालाही कृष्णेच्या पुरानं वेढा घातला आहे. जुनं जिल्हाधिकारी कार्यालय असलं तरी अजूनही तिथे काही सरकारी विभागांचं कामकाज चालतं.

रेस्क्यू ऑपरेशनला युद्धपातळीवर  
सांगलीत काही ठिकाणी 2005 च्या महापुरापेक्षाही गंभीर परिस्थिती आहे. सांगली शहरासोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुरानं थैमान घातलंय. नांद्रेगावात तर घरं, शेती, शाळा सर्व काही पुराच्या पाण्यात बुडालं आहे. पुराच्या पाण्यानं सर्वात जास्त नुकसान फळबागांचं झालं आहे. ग्रामस्थांच्या रेस्क्यूसाठी एनडीआरएफची टीम नांद्रेगाव दाखल झाली असून रेस्क्यू ऑपरेशनला युद्धपातळीवर सुरु आहे.

कोल्हापुरातही  जनजीवन विस्कळीत
सांगलीसारखाच भयंकर महापूर कोल्हापुरातही आहे. संपूर्ण कोल्हापूर शहराला महापुरानं वेढा घातलाय. त्यामुळे कोल्हापुरातून बाहेरही निघता येत नाही. कालपर्यंत सुरळीत असलेला वीजपुरवठाही संध्याकाळपासून खंडीत करण्यात आला आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर शहरातील अनेक भागांमध्ये घरं, दुकानांमध्ये पाणीच पाणी झालं आहे.

महाभयंकर परिस्थितीत लोकांच्या बचावासाठी सांगली, कोल्हापुरात लष्कराची मोठी तुकडी दाखल झाली आहे. तर वायूसेनेच्या विमानांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून कोणत्या भागात जास्त मदतीची गरज आहे याचा आढावा घेतला आहे. दुसरीकडे एडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथकांनी पुरामध्ये अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी बोटी आधीच पंचगंगेच्या विस्तीर्ण पात्रात उतरवल्या आहेत. कोणत्याही मदतीविना अनेक घरं, माणसं, जनावरं पाण्यात आहेत.  त्यामुळे पाणी लवकरात लवकर ओसरावं अशी प्रार्थना कोल्हापूरकर करत आहेत.