kolhapur News Update : "शाहू महाराजांनी सत्य समोर आणल्याने भाजपची कोंडी झालीय. भाजपने संभाजीराजे यांचा सतत गैरवापर केला. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.  परंतु, छत्रपती शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुखवटा फाडला, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.  


"शिवसेनेनं कधीही छत्रपती घराण्याचा अवमान केला नाही, असं शाहू महाराज म्हणाले. हा आम्हाला अंबाबाईनं दिलेला आशीर्वाद आहे. आता तरी भाजपनं शानं व्हावं. आम्ही संभाजीराजे यांना सन्मानाने पक्षात बोलवत होतो. पण भाजपने संभाजीराजे यांचा गैरवापर केला. आज शाहू महाराज यांनी त्यांचा मुखवटा फाडला. त्याबद्दल मी शाहू महाराज यांचे आभार मानतो. शिवसेनेने कधीच छत्रपती घराण्याचा अपमाम केला नाही. तर कायम त्यांचा मान राखला आहे. भाजपने कारस्तान करून शिवसेनेला बदनाम करण्याचं काम केलं. याबरोबरच भाजपने समाजात तेढ निर्माण करण्याचं काम केलं, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.  


संजय राऊत म्हणाले, "आम्ही बोललो की देशद्रोह होतो. आम्हाला ईडीची भीती दाखवली जाते. आम्ही प्रश्न विचारले की आमच्या घरी ईडी पाठवली जाते. चालू न झालेल्या रिसॉर्टमधील पाणी समुद्रात जातं म्हणून ईडीने धाड टाकली. दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी मुंबईत धाडी टाकल्या जातात. कितीही ईडीची भीती दाखवली तरी शिवसेना झुकणार नाही आणि महाराष्ट्र वाकणार नाही."


"आधी महागाईवर चर्चा व्हायची आता आजान आणि टोपी यावर चर्चा होते. आज देशात तीनशे पटीने महागाई वाढली आहे. बेरोजगारीवर आज कोण बोलत नाही. महागाईवर विचारलं तर उत्तर प्रदेशमधील ज्ञानव्यापी मशिदीवर बोललं जातं. देशाला दिलेल्या दोन कोटी नोकऱ्यांच्या आश्वासनाचं काय झालं?  


कोल्हापूरची भूमी क्रांतिकारक
कोल्हापूरने शिवसेनेला भरपूर दिलं आहे. कोल्हापूरची भूमी क्रांतिकारक असून कोल्हापूरची भूमी दिलदार आहे. जेंव्हा जेंव्हा बेळगावमध्ये मराठी बांधवांची कोंडी केली जाते, त्यावेळी कोल्हापूर सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी उभा राहते, असे कौतुक संजय राऊत यांनी केले.   


शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे यांच्या पोटात दुखायला लागले आहे. परंतु या सगळ्यांना पुरून शिवसेना महाराष्ट्रात उभा राहणार आहे. उद्धव ठाकरे कसे आहेत? कोल्हापुरातील एका शिवसैनिकाला अलगत उचलला आणि दिल्लीला नेऊन ठेवला, असे संजय राऊत म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या


Sambhajiraje : वडिलांचा आदर करतो पण शिवरायांना स्मरुन सांगतो, मी खरं तेच बोललोय; शाहू महाराजांच्या खड्या बोलानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया