kolhapur News Update : शाहू महाराजांनी सत्य सांगून एका शब्दात देवेंद्र फडवीस यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांना आडवे पाडले. शिवसेना ही फसवणाऱ्यांची संघटना नाही असे शाहू महाराजांनी सांगितले आहे. ज्यांनी शिवसेनेला फसवलं तेच शिवसेनेने संभाजी राजे यांना फसवल्याचा आरोप करत आहेत. परंतु, शाहू महाराजांनी यांचा बुरखा फाडला आहे. खोटे आरोप करून शिसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, यांनी कितीही प्रयत्न केले तरी यापुढे महाराष्ट्रात कधीच भाजपचं सरकार येणार नाही, असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी केला आहे.  


कोल्हापूर जिल्ह्यात शिवसनेचे संपर्क अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत संजय राऊत कोल्हापुरातील कागल येथे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले, ज्यांनी शिवसेनेला शब्द देऊन फसवले तेच आज शिवसेनेने संभाजीराजे यांना फसवले असे आरोप करत आहेत. परंतु, शिवसेनेवर खोटे आरोप करणाऱ्यांचा शाहू महाराज यांनी  बुरखा फाडला आहे. शिवाय भाजपच्या सर्वच नेत्यांचे मी आभार मानतो की तुम्ही शब्द पाळला नाही त्यामुळे हे चांगलं सरकार राज्याला मिळालं." 


"स्वाभिमान हा शब्द कोणत्या मातीत रुजला असेल ती भूमी कोल्हापूरची आहे. संजय पवार हे कोल्हापुरातील शिवसेनाचे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे 30 वर्षे भगवा खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या संजय पवार यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. शाहू महाराज यांच्या विचाराने महाविकास आघाडी सरकार चालत आहे. आपल्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. विरोधकांना अडीच वर्षे झोप लागत नाही. भाजपचे नेते सरकार पडण्याची रोज वेगळी तारीख देत आहेत. परंतु, काही केल्या हे सरकार पडणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. 
 
"आमच्या राष्ट्रभक्तीमध्ये कुठेही भेसळ नाही. गेल्या तीन वर्षात 50 हल्ले झाले आहेत. काश्मीरमध्ये रोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. परंतु, यावर पंतप्रधान कधी  बोलत नाहीत. भाजपवाल्यांचे हिंदुत्व  ज्ञानव्यापीमध्ये आहे. आमच्या देवांचा देव महादेव जिथे बसले आहेत ते मानसरोवर चीनच्या ताब्यात आहे,  ते आधी आपल्या ताब्यात घ्या, चीनचे सैनिक आपल्या हद्दीत घुसले आहे, त्यांना बाहेर काढा. परंतु, असे प्रश्न विचारले की आमच्या मागे ईडी लावली जाते. कागलपर्यंत देखील ईडी येऊन गेली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी भाजपवर केली.  


संजय राऊत म्हणाले, "यांचे काही नेते म्हणतात पोलीस बाजूला करा मग सांगतो, आम्ही म्हणतो ईडी बाजूला करा मग आम्ही पण सांगतो. राम ते औरंगजेब असा यांचा प्रवास सुरु आहे. ऊठ की सूट कबरीचं काय झालं म्हणतात. परंतु, औरंगजेबाची कबर केंद्राच्या ताब्यात आहे, ती फोडून दाखवा."