दृश्यम चित्रपटात मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाची हत्या करुनही अजय देवगण आणि त्याचे कुटुंबीय पोलिसांना सापडत नाहीत. हाच प्रयत्न सांगली जिल्ह्यातील कुपवाडच्या नगरकर कुटुंबानं केला. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीनं दोन दिवसात आरोपींना जेरबंद केलं.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील शब्बीर बोजगर पोलीस विभागात काम करतात. त्यांचा मुलगा शाहरुख बोजगरचा कर्नाटकातील हणबरवाडी इथं 11 जुलैला निर्घृण खून झाला.
शाहरुख याचे सांगलीतील एका युवतीशी प्रेमसंबंध होते. पण त्या मुलीचं लग्न झाल्याची बातमी शाहरुखला कळाली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. त्यातून मुलीनं सहा महिन्यापूर्वी आत्महत्या केली.
आपल्या मुलीनं शाहरुखच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा राग रवींद्र नगरकर यांना आला. त्यानंतर वडिलांनी आपली दोन मुलं सुमीत आणि रोहितसह मिळून शाहरुखची हत्या करण्याचा प्लान केला.
शाहरुखला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी मुलीच्या एका भावानं सोशल मीडियावर फेक अकाऊंट उघडलं. शाहरुखशी चॅटिंग सुरु केलं. त्यातून मैत्रीचे संबंध वाढवले आणि हणबरवाडीला बोलावलं. 11 जुलै रोजी बापलेकांनी एका साथीदारासह शाहरुखचा काटा काढला.
दृश्यम चित्रपटातील नायकानं आपल्या मुलीला छेडणाऱ्याची हत्या लपवून ठेवली, पुरावे नष्ट केले. पण हा चित्रपट होता. प्रत्यक्ष जीवनात आरोपी काही ना काही चूक करतो आणि तंत्रज्ञानाच्या युगात पुरावेही मिळतात. त्यामुळे आरोपी कितीही चतुर असला तरी कानून के हात लंबे होते है हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.