कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रच लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरातील शाळकरी मुलगा दर्शन शहा याच्या खून खटल्याचा निकाल जाहीर झाला आहे. खंडणीसाठी दर्शनचं अपहरण करुन खून केल्याप्रकरणी आरोपी योगेश उर्फ चारु चांदणेला सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 1 लाख 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी हा निकाल आज दिला.
कोल्हापूरच्या देवकर पाणंद इथे राहणारा अल्पवयीन शाळकरी मुलगा दर्शन शहाचं 25 डिसेंबर 2012 रोजी योगेश उर्फ चारु चांदणेने अपहरण केलं होतं. दुसऱ्या दिवशी देवकर पाणंद परिसरातील विहिरीत दर्शनचा मृतदेह सापडला होता, त्याचबरोबर दर्शनच्या घरासमोर 25 तोळे खंडणीची मागणी करणारी चिठ्ठीही मिळाली होती.
पोलिसांनी घटनेचा तपास करुन चारु चांदणे या आरोपीला अटक केली होती. मार्च 2013 मध्ये चांदणे याच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. जानेवारी 2016 पासून या खटल्याची सुनावणी सुरु झाली. या केसमध्ये न्यायालयात 30 साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 22 पुराव्यांची साखळी मांडली. याशिवाय परस्थितीजन्य पुरावेही मांडले. सोमवारी या खटल्यावर निकाल होण्याची शक्यता होती, त्यामुळे आरोपी चांदणेला पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीश बिले यांनी आरोपी चांदणेला या गुन्ह्यात दोषी ठरवलं.
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे असून सुप्रीम कोर्टाचे दाखले देत दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळून लावत आरोपी चारु चांदणेला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि 1 लाख 5 हजारांचा दंड ठोठावला.
या दंडातील एक लाखाची रक्कम ही दर्शनच्या आईला देण्याचंही न्यायालयाने निकालात नमूद केलं आहे.
दर्शन शाह अपहरण-हत्या : दोषीला जन्मठेप आणि एक लाखांचा दंड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Oct 2017 03:32 PM (IST)
कोल्हापूरच्या देवकर पाणंद इथे राहणारा अल्पवयीन शाळकरी मुलगा दर्शन शहाचं 25 डिसेंबर 2012 रोजी योगेश उर्फ चारु चांदणेने अपहरण केलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -