सातारा/कोल्हापूर: पैलवान निलेश कंदूरकरची सहा दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.  कुस्ती खेळताना गंभीर दुखापत झालेल्या निलेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये पहाटे 4 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.

कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे इथे 1 एप्रिलला झालेल्या कुस्ती मैदानातील एका लढतीत, 20 वर्षांचा तरुण पैलवान निलेश विठ्ठल कंदूरकरला गंभीर दुखापत झाली होती.

निलेशवर सुरुवातीला कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आलं. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याला मुंबईला हलवण्यात येत होतं. पण वाटेतच रुग्णवाहिकेत त्याची प्रकृती बिघडल्याने, त्याला कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

जोतिबाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचा आखाडा
कोल्हापुरातील बांदिवडे या गावात जोतिबा यात्रेनिमित्त एक कुस्तीचं मैदान भरवण्यात आलं होतं. या मैदानात कुस्ती खेळण्यासाठी 20 वर्षीय रांगडा पैलवान निलेश अंगाला लाल माती लावून मैदानात शड्डू ठोकत उतरला. कुस्ती सुरु झाली आणि प्रतिस्पर्धी पैलवानाने निलेशला आपल्या कवेत धरत उचलून जमिनीवर आपटले. या डावात निलेश डोक्यावर आदळून जमिनीवर निपचित पडला.

मानेच्या शिरेला दुखापत
पैलवान निलेश हा यंदाच्या कुस्ती हंगामात कोणत्या ही पैलवानासोबत जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटात लढत निकाली काढत होता. परंतु रविवारी झालेल्या मैदानात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या मानेच्या शिरेला दुखापत झाली होती.

निलेशच्या घरातच कुस्तीची परंपरा
पैलवान निलेश हा कुस्ती परंपरेच्या घरातील आहे. त्याचे आजोबा, वडील पै. विठ्ठल कंदूरकर, वडिलांचे मामा वस्ताद कै.सावळा गवड बांदिवडे हे नामांकित पैलवान होते. आपला मुलगाही चांगला पैलवान व्हावा यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र रविवारी झालेल्या कुस्ती मैदानात निलेश निपचित पडला आणि त्यांची सगळी स्वप्ने त्याच मातीत गाडली गेली.

मुंबईत हलवण्याचा निर्णय, पण...
निलेशला उपचारांसाठी कोल्हापुरातील मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु या ठिकाणी उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्याला पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कोल्हापूरचे समन्वयक विजय जाधव यांना सूचना दिल्या.

त्यानुसार त्याला मुंबईत हलवण्याची प्रक्रिया पार पाडली. एक रुग्णवाहिका निलेशला घेऊन मुंबईच्या दिशेने निघाली, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे कराडच्या कृष्णा हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं. निलेशची प्रकृती गंभीर होती. या संकटाला चितपट करुन निलेश सुखरुप बाहेर यावा अशी प्रार्थना कुस्तीप्रेमी करत होते.

संबंधित बातम्या

कुस्तीच्या आखाड्यात गंभीर दुखापत, पैलवान निलेशची मृत्यूशी झुंज

VIDEO: