कोल्हापूर : हनी ट्रॅपच्या माध्यमातून फसलेल्या आणि सातत्याने होणाऱ्या ब्लॅकमेलला कंटाळून एका तरुणाने स्वतःची जीवन यात्रा संपवली. हा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील घडला आहे. फेसबुकवरून संपर्कात आलेल्या महिलेशी अश्लील चाळे झाल्यानंतर महिलेने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. संतोष मनोहर निकम असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून संतोष हा फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीच्या संपर्कात आला होता. फेसबुक वरून त्यांच्यात मैत्री झाली आणि संबंधित महिलेने संतोष याच्याशी फेसबुकच्या माध्यमातून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचाही व्हिडीओ संवाद सुरू झाला. या मोहजालात फसवत हरियाणातील तरुणीने स्वतः अश्लील चाळे करत संतोषला देखील अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त केले. नंतर याचाच फायदा घेत संबंधित तरुणीने संतोष यांच्याकडे पैशाची मागणी केली. अन्यथा व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी दिली.
आपण मोहजालात फसलो असल्याचे लक्षात आल्याने संतोष निराश झाला. निराशेने ग्रासलेल्या संतोषने दोन दिवसांपूर्वी घरी आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता हे प्रकरण समोर आले आहे. याबाबत इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हनी ट्रॅपचा हा जिल्ह्यातील पहिला बळी असल्याचे मानले जात आहे. दरम्यान याबाबत अनेक तक्रारी निनावी पत्राद्वारे पोलिसांकडे आल्या आहेत. मात्र तरुणांनी धाडसाने समोर येऊन याबाबत तक्रार दाखल करावी असे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- CM Uddhav Thackeray : शाळेत मोकळं ढाकळं वातावरण ठेवा, पण काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
- Pandora Papers : परदेशात गुंतवणूक करणाऱ्यांचा तपशील असलेल्या पँडोरा पेपर्समध्ये सचिन तेंडुलकरचंही नाव?
- Coronavirus Updates : देशातील सक्रिय रुग्णसंख्या घटली, रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही गेल्या दीड वर्षातील सर्वाधिक