कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसरातील बागेत अश्लील चाळे करणाऱ्या 10 महाविद्यालयीन जोडप्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणातील सर्व मुली अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या आहे.
कोल्हापुरातील रंकाळा तलावाशेजारी असणाऱ्या बागेत सकाळी काही नागरिक व्यायामासाठी तर काही फिरण्यासाठी येत असतात. याच परिसरातील काही महाविद्यालयीन प्रेमीयुगुलंही या परिसरात येतात. इतर वेळी कोणी हटवत नसलं तरी बुधवारची सकाळ मात्र 10 प्रेमी युगुलांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
ही जोडपी अश्लिल चाळे करत असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं. यावेळी नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर निर्भया पथक आणि दामिनी पथकानं रंकाळा बागेत जाऊन या जोडप्यांना रंगेहाथ पकडलं.
विशेष म्हणजे या प्रकरणातील मुली या अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या आहेत, तर सर्व मुलं ही टवाळखोर आणि निरुद्योगी आहेत. या प्रेमीयुगुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यात आली.