अकोला : जिल्ह्यातील अकोट मतदारसंघाचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. मतदारसंघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना 'उपरे' ठरवत त्यांच्याविरोधातच एल्गार पुकारला आहे. भारसाकळेंऐवजी कोणत्याही स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.


अकोला भाजपमध्ये सध्या अकोटमधील प्रमुख कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांच्या आमदाराविरोधातील बंडाने चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अकोट मतदारसंघात या कार्यकर्त्यांनी बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. सोबतच या सर्व बंडखोरांनी संजय धोत्रे, डॉ. रणजीत पाटलांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आमदार भारसाकळे निष्क्रीय असल्याची तक्रार केली आहे. भारसाकळे हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे रहिवाशी आहे. सोबतच ते दर्यापूरमधून पाचवेळा आमदार राहिले आहेत.


अकोला भाजपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आणि स्थानिक खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. रणजित पाटील असे दोन गट आहेत. आमदार भारसाकळे भाजपाच्या राजकारणात धोत्रे गटाचे म्हणून ओळखले जातात. यानिमित्ताने ऐन विधानसभेच्या तोंडावर अकोला भाजपमध्ये संजय धोत्रे आणि डॉ. रणजीत पाटील गटातील वाद रंगण्याची चिन्हं आहेत.


2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश भारसाकळे 32 हजार मतांनी विजयी झाले आहेत. मात्र भारसाकळेंनी मागच्या पाच वर्षांत मतदार संघाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केला आहे. सोबतच आमदारांनी कार्यकर्त्यांना सन्मान न देता आरेरावी केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.


"अकोट मतदारसंघात आतापर्यंत 'बाहेर'चे उमेदवार दिल्या गेलेत. सध्याच्या आमदारांना मागच्यावेळी आम्ही विकासाच्या अपेक्षेनं मदत केली. मात्र, त्यांचं अकोटपेक्षा दर्यापूरकडे जास्त लक्ष असल्यानं मतदारसंघाचा विकास झाला नाही. त्यांच्या निष्क्रियतेनं सरकारनं पैसा देऊनही काम झाली नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांशीही आरेरावीची वागणूक केली आहे. त्यामूळे आम्ही जन्मानं आणि कर्मानं स्थानिक उमेदवाराची पक्षाकडे मागणी केली आहे", असं भाजपनेते आणि माजी नगराध्यक्ष पुरूषोत्तम चौखंडे यांनी म्हटलं आहे.




तर "मोठ्या पक्षात अशा गोष्टी चालतात. पुढच्या काही दिवसांत या सर्वांचा गैरसमज दुर होईल. हे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्या प्रचारात असतील. मी सर्वांशीच चांगला वागतो आणि संपर्क ठेवतो. शेवटी पक्षच सर्व गोष्टींचा निर्णय घेत असतो", अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश भारसाकळे यांनी दिली आहे.

 

कोण आहेत प्रकाश भारसाकळे?



  • सध्या अकोला जिल्ह्यातील अकोटचे भाजप आमदार. या कार्यकाळात पंचायतराज समितीचं अध्यक्षपद

  • 1990, 1995, 1999, 2004 मध्ये सलग शिवसेनेच्या तिकिटावर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून विजयी

  • 2005 मध्ये नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश. पोटनिवडणुकीत विजयी

  • 2009 च्या निवडणुकीत दर्यापूर अनुसुचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर काँग्रेसनं अकोटमधून तिकीट नाकारल्यानं अपक्ष निवडणूक लढवली

  • त्यानंतर भाजप प्रवेश करत 2014 मध्ये अकोटमधून विजयी