कोल्हापूर : कोल्हापूरच्या यळगूडची सायली आणि सांगलीतल्या येलूरचा योगेश... नुकतेच विवाहबद्ध झाले... पण लग्नाआधीच नोटाबंदी आल्यामुळे दोन्ही कुटुंबांची तारांबळ उडाली नि लग्नघराच्या मदतीला अख्खं गाव बँकेच्या रांगेत उभं राहिलं.


तशी लग्नाची सगळी तयारी झाली होती. पण लग्नमंडपात रोख लागली तर काय करायचं, असाही प्रश्न पडला. मग काय, अख्खं गाव बँकेच्या रांगेत उभं राहिलं आणि आपल्या लेकीचं लग्न पार पाडलं.

आम्ही रांगेत उभे राहिलो आणि प्रत्येकाने आपापल्या खात्यातले प्रत्येकी अडीच हजार काढले, असं यळगूडचे रहिवासी सांगतात. गावातल्या सगळ्या परिवारांनी पैसे दिले आणि लग्न पार पडलं, याचा अभिमान त्यांच्या डोळ्यात दिसतो.

कसोटीच्या काळात अख्खं गाव पाठीशी उभं राहिलं. त्यामुळे पोरीची पाठवणी करणाऱ्या आई-बापाचा ऊर भरून आला. शेजाऱ्यांच्या, मित्र परिवाराच्या मदतीने लग्न सुखरुप पार पडल्याचं नवरीची आई आवर्जून सांगते.

नोटाबंदीमुळे कितीही ओढाताण होत असली, तरी जनता परिस्थितीला तोंड देत आहे. कारण जवळचं नुकसान कुरवाळत बसण्यापेक्षा लांबचा फायदा पाहणं आज महत्त्वाचं आहे.