मुंबई: 'महाराष्ट्रातील नगरपालिकांमध्ये मिळालेला विजय ही फक्त लाट नाही तर ही त्सुनामी आहे त्सुनामी. आणि ही त्सुनामी चांगल्या विचारांची आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं मी मनापासून आभार मानतो. भाजपचा हा विजय महाराष्ट्राला अपर्ण करतो.' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिका विजयाचं श्रेय महाराष्ट्रातील जनतेला दिलं.


महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं चांगलीच बाजी मारली. त्यानंतर आज भाजपनं मुंबईत सेलिब्रेशन केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'भाजपच नंबर वन आहे हे जनतेनं दाखवून दिलं आहे.  शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आमचं सरकार कारभार करीत आहे.' असंही मुख्यमंत्री म्हणाले.

याचवेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचंही कौतुक केलं. 'मोदींच्या या निर्णयाला भारतातील आणि महाराष्ट्रातील जनता सोबत असून ते मोदींच्या या निर्णयाच्या पाठीशी आहेत. त्यामुळेच बँकांच्या रांगेत उभं राहून सामान्यांनी या देशभक्तीत आपला मोलाचा वाटा उचलला. आजवर निवडणुकीआधी अनेकांनी वचनं दिली. पण मोदींनी फक्त वचनच दिलं नाही तर ती वचनं सक्षमपणे पूर्णही केली.' असंही फडणवीस म्हणाले.