kolhaprur Direct Pipeline : प्रदीर्घ कालावधीपासून प्रतीक्षेत असलेली थेट पाईपलाईन योजना पूर्णत्वाकडे जात असून पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत ती पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती माजी गृहराज्य मंत्री आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. काळम्मावाडी थेट पाईपलाईन प्रकल्पाचा उद्देश कोल्हापूरच्या नागरिकांना शुद्ध व नियमित पाणी उपलब्ध करून देण्याचा आहे. केंद्र आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असताना 2014 मध्ये याला मंजुरी देण्यात आली होती.


सतेज पाटील म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत थेट पाईपलाइनचे काम जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल. धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पुरेशा प्रमाणात शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असा शब्द मी नागरिकांना दिला होता. आश्वासन लवकरच पूर्ण होईल. हा प्रकल्प प्रचंड, विशाल आणि गुंतागुंतीचा आहे. पाणी साठवण्यासाठी चेकडॅम बांधावे लागतील आणि तेथून ते पाईपलाईनने कोल्हापूरला नेलं जाईल. प्रकल्प पूर्ण होण्यास होत असलेल्या दिरंगाईबद्दल पाटील यांना यापूर्वी राजकीय विरोधकांकडून टीकेला सामोरे जावे लागले आहे.


सतेज पाटील पुढे म्हणाले, “खरंच विलंब झाला आहे. शेतातून पाईपलाईन टाकण्यात आली असून काही वेळा शेतकऱ्यांना समजावून सांगणे कठिण होते. शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांना तोंड देणेही अवघड होते. वनविभागाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे वेळखाऊ होते. पण शेवटी आम्ही ते नियोजन केले आणि आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या. सुमारे 53 किमी लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली आहे, 63 व्हॉल्व्ह या मार्गावर बसविण्यात आले आहेत. एखाद्या परिस्थितीत गळती राहिली असल्यास ती तपासण्यासाठी हायड्रोलिक चाचणी केली जाणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या