अंबाबाई देवीचे 1917 पासून आजपर्यंत शंभर वर्षात पाच ठिकाणी भंगलेले मूर्तीचे फोटो उपलब्ध आहेत. खरंतर मूर्तीची अवस्था पाहावत नाही. 2016 मध्ये मूर्तीचे संवर्धन केलं. त्यावेळी संवर्धन प्रक्रिया केली तरी मूर्तीची झीज मोठ्या प्रमाणात झाल्याने संवर्धनाची गॅरंटी देता येत नाही, असे पुरातत्त्व खात्याने जाहीर केलं होतं. यावेळी देवीच्या मूर्ती संवर्धन प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं होतं. तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी हे चित्रीकरण पाहिल्यानंतर हे चित्रीकरण म्हणजे 'जिवंत बॉम्ब' आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र हे चित्रीकरण भक्तांसमोर आणण्यात आलेलं नाही.
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्यातील मूळ मूर्तीची नित्य पूजा म्हणजे अभिषेक स्नान, आरती, मंत्रपठण झालंच पाहिजे. श्री अंबाबाईचे स्थान जागृत आहे. ते जागृत ठेवण्यासाठी या सर्व प्रक्रिया नित्यनियमाने होणे गरजेचं असतं. पाच ठिकाणी भंगलेल्या देवीची मूर्तीवर मस्तकाभिषेक गेली तेरा वर्षे घातलेला नाही. ही मूर्ती अभिषेक, आंघोळ यापासून दूर असल्याने 'पारोशी' अशीच राहिलेली आहे. देवदेवतांचे देवत्व अबाधित राखण्यासाठी या सर्व प्रक्रिया नित्यनेमाने होत नाहीत, याची कल्पना असूनही याकडे प्रशासन आणि पुजारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भक्तांनी केलेला आहे.
अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक संपूर्ण देशातून कोल्हापुरात दाखल होत असतात. तिरुपती, शिर्डीच्या साई मंदिराप्रमाणेच कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात ही देवीचा मस्तकाभिषेक भाविकांना पाहता यावा अशी मागणी भक्तांकडून होती. 2014 सली भंगलेली मूर्ती बदलण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं. मात्र मधल्या काळात मंदिरातील पुजारी हटाव आंदोलन सुरु झालं, यासह विविध आंदोलनांमुळे मूर्ती बदलाची मुख्य मागणी बाजूला पडली. यासंदर्भात श्रीपूजक आणि देवस्थाने पुढाकार घेतला तर देवीची भंगलेली मूर्ती बदलून त्या ठिकाणी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होऊ शकते. मात्र हा विषय भावनिक असल्यामुळे या विषयात हात घालण्यासाठी कोणीही तयार होताना दिसत नाही.