जळगाव : तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेला दणदणीत विजय अनेक जणांना नवी उर्मी देणारा ठरला. मात्र हाच अत्यानंद एका कार्यकर्त्याच्या जीवावर उठला. अत्यानंदामुळे जळगावातील काँग्रेस कार्यकर्त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.

जळगावातील पारोळ्यात राहणारे सुरेश ठाकरे हे काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष होते. सुरेश ठाकरे गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिले आहेत. पारोळा तालुक्यातील काँग्रेस पक्षात त्यांनी विविध पदे भूषवली आहेत.

तीन राज्यात काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर पक्षाच्या एका कार्यकर्त्याने त्यांना जल्लोष करण्यासाठी पारोळ्याला येण्यासाठी फोन केला होता. काँग्रेसच्या विजयाचा निकाल ऐकताच त्यांना खूपच आनंद झाला. कार्यकर्त्याकडून फोनवर अधिक माहिती जाणून घेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला.

सुरेश ठाकरे यांना तातडीने धुळ्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे काँग्रेसमधील कार्यकर्त्यांसह त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली.