कोल्हापुरात अंबाबाईच्या भक्तांचा श्रीपूजकांवर भ्रष्टाचाराचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2017 08:00 PM (IST)
कोल्हापूर : कोल्हापुरातील अंबाबाईच्या पुजाऱ्यांविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अंबाबाईच्या भक्तांनी पुजारी हटावच्या घोषणा देत एकच गोंधळ घातला आणि भ्रष्टाचाराचाही आरोप केला आहे. अंबाबाईच्या साड्यांमध्येही भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप अंबाबाईची सेवा करणाऱ्या श्रीपूजकांवर केला जात आहे. मंदिराभोवती असलेल्या दुकानांमधून आलेल्या ओट्यांमधल्या साड्यांमध्येही खाबूगिरी होत असल्याचा आरोप आहे. देवीला साडी 1 हजार रुपयांची घेतली, तर ती साडी परत प्रसाद म्हणून घेण्यासाठी पुजाऱ्याला 800 रुपये दिल्याशिवाय पुजारी ती साडी परत देत नाही, असा आरोप होत आहे. आधीच श्रीपूजक भक्तांच्या निशाण्यावर आहेत. त्यात त्यांनी थेट शाहूंच्या वटहुकूमाला तथाकथित म्हटल्यानं वाद आणखी चिघळला. वादांची यादी खूप मोठी आहे.. आधी श्रीपूजकांनी तृप्ती देसाई यांना गाभाऱ्यात जाण्यापासून अडवलं, नंतर अंबाबाईचं नाव महालक्ष्मी करण्याचा आरोप पूजकांवर झाला. त्यानंतर अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाल्यानं देखरेखीवर आक्षेप घेतला. महालक्ष्मीच्या माथ्यावरचा नाग हटवल्याचा आरोप करण्यात आला. निवृत्त पुरातत्व अधिकाऱ्याला मूर्तीची तपासणी करु दिल्याचा आरोप झाला. मग अंबाबाईला पारंपरिक साडीऐवजी घागरा आणि चोळी नेसवण्यात आली. पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे, त्यात काय होतं यावर अंबाबाईच्या पुजाऱ्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. ज्या मंदिरात सुख आणि शांती लाभावी हे मागणं भक्त मागतात, त्याच आईच्या दरबारात वादांची मालिका रंगली आहे. अंबाबाईचे श्रीपूजक आतापर्यंत मौन बाळगून आहेत. उद्याच्या बैठकीत त्यांनी आपल्यावरच्या या सर्व आरोपांची उत्तरे देऊन कारभार आणखी पारदर्शक करण्याची गरज आहे.