कोल्हापूर : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळ एका चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे ज्या गाडीने या महिलेला धडक दिली, ती कार क्रिकेटर अजिंक्य रहाणेच्या वडिलांची असल्याची माहिती समोर आली आहे.
कागलजवळ गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग 4 वर आय 20 या कारने महिलेला धडक दिली. या अपघातात आशाताई कांबळे ही महिला गंभीर जखमी झाली होती. उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच आशाताईंचा मृत्यू झाला.
हा अपघात मुंबईचे रहिवासी असलेले मधुकर बाबुराव रहाणे यांच्या आय 20 कारच्या धडकेत झाल्याची तक्रार, आशाताई यांची मुलगी स्वाती ढोबळेंनी कागल पोलिस स्टेशनमध्ये दिली.
मधुकर बाबुराव रहाणे हे भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणेचे वडील आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि मुलगीही होत्या. मधुकर रहाणे संपूर्ण कुटुंबासोबत मुंबईला जात होते.
पोलिसांनी अजिंक्य रहाणेच्या वडिलांची कार जप्त केली असून त्यांनाही ताब्यात घेतलं होतं. परंतु हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने पोलिसही बोलण्यास टाळत आहेत.