बेपत्ता पोलिस अश्विनी बिद्रेंना अभय कुरुंदकरांची मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 05 Dec 2017 06:25 PM (IST)
अश्विनी आणि अभय यांच्यात प्रेमसंबंध होते. पण कालांतराने त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यातूनच अश्विनी यांना कुरुंदकर यांनी बेपत्ता केल्याचा दावा बिद्रे कुटुंबीयांनी केला आहे.
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षांपासून बेपत्ता असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. त्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर हे त्यांना मारहाण करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कुरुंदकरांवरील संशय बळावला आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी कळंबोली पोलिस ठाण्यात रुजू होण्यासाठी रवाना झालेल्या अश्विनी बिद्रे बेपत्ता आहेत. पण त्या स्वतः गायब झाल्या नसून त्यांना अभय कुरुंदर यांनी बेपत्ता केला असल्याचा आरोप अश्विनी यांचे बंधू आनंद बिद्रे यांनी केला आहे. अश्विनी आणि अभय यांच्यात प्रेमसंबंध होते. पण कालांतराने त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यातूनच अश्विनी यांना कुरुंदकर यांनी बेपत्ता केल्याचा दावा बिद्रे कुटुंबीयांनी केला आहे. रत्नागिरीत राहत असताना अश्विनी यांच्या फ्लटॅमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. 'माझा'ला मिळालेल्या या व्हिडीओसारखेच अनेक व्हिडीओ बिद्रे कुटुंबीयांनी पोलिसांकडे सादर केले आहेत. पण त्यानंतरही ऑन ड्युटी असलेल्या कुरुंदकर यांना अटक का होत नाही, असा सवाल बिद्रे कुटुंबीयांनी केला आहे. नेमकं काय प्रकरण आहे? 15 एप्रिल 2016 पासून अश्विनी राजू गोरे या महिला पोलिस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी तिला बेपत्ता केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या तपासात पोलिसच त्याना सहकार्य करत नसल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे या 2000 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. याचदरम्यान त्यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.