अहमदनगर : अहमदनगरमध्ये झेलम एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास श्रीगोंदा रेल्वे स्थानक परिसरात खिडकीतून आत हात घालून ही लूट करण्यात आली. झेलम एक्स्प्रेस पुण्यावरुन जम्मू तावीला जाते.
तिघा लुटारुंनी प्रवाशांचे मोबाईल, घड्याळ आणि सोन्याची चेन लुटली. साधारणपणे एक लाखाचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे. पुणे आणि जळगाव जिल्ह्यातील आरबी दास, राणी खान, बाबू खान आणि वैष्णवी हेगडे या प्रवाशांना लुटण्यात आलं.
सिग्नल नसल्यामुळे झेलम एक्स्प्रेस श्रीगोंदा रेल्वे स्थानकात थांबली होती. त्यावेळी तिघा भामट्यांनी खिडकीतून हात घालून लूट केली. या प्रकरणी रात्री दोन वाजता अहमदनगर रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पथक श्रीगोंद्याला रवाना झालं आहे.
गेल्या महिन्यातच दरोडेखोरांनी नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेस लुटली होती. प्रवाशांना धमकावून लाखोंचा ऐवज लुटण्यात आला होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. मात्र त्यानंतरही श्रीगोंद्यात वारंवार रेल्वे प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण असून रेल्वेतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.