कोल्हापूर : महिलांच्या कार चालवण्याच्या कौशल्यावर अनेक जण कायम शंका उपस्थित करतात. थोड्या-थोडक्या महिलांमुळे समस्त महिला कारचालक बदनाम झाल्या आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. बायकोला कार चालवायला शिकवणं कोल्हापुरातील एका नवऱ्याला चांगलंच महागात पडलं. गाडी चालवण्याचा सराव करताना महिलेने कार थेट खड्ड्यात घातली.


कोल्हापुरात राजारामपुरीतील महापालिकेच्या नऊ नंबरच्या शाळेच्या मैदानात हा अपघात झाला. पाण्याच्या मोठ्या पाईपलाईनसाठी खड्डा खोदण्यात आला होता. मात्र ड्रायव्हिंग शिकणाऱ्या महिलेच्या हे लक्षात आलं नाही आणि तिने कार थेट खड्ड्यात घातली.

कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे पती-पत्नी कारसह थेट आठ फूट खोल खड्ड्यात पडले. सुदैवाने थोडक्यात निभावलं, आणि नवरा-बायको दोघंही या अपघातातून बालंबाल बचावले. जोडप्याला दुखापत झाली असली तरी ते सुखरुप आहेत.

कार खड्ड्याबाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे गाडी दुरुस्तीसाठी नवरोबाला पैसा ओतावा लागला असेलच. मात्र पत्नीच्या हाती पुन्हा कारच्या चाव्या द्यायच्या की नाही, याचा पुनर्विचारही त्याला करावा लागला असणार.