कोल्हापूर :  कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या 48 तासात खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. कॉलगर्ल प्रेयसीनं लग्न करण्यास नकार दिल्यामुळे तिचा खून केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर अक्षय शिंदेला अटक केली आहे.

 

सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

 

मंगळवारी  २१ जूनला सकाळी शिवाजी पुलाच्या पलीकडे आंबेवाडी फाट्यापासून काही अंतरावर पाटील महाराज यांच्या समाधी स्थळ परिसरात गवताच्या शेतात तरुणीचा मृतदेह सापडला होता.  २२ ते २५ वार केल्यामुळे तरुणी जागीच ठार झाली होती.

कॉलगर्लशी प्रेमप्रकरण

याबाबत करवीर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी पथके नेमली होती. याच परिसरात लावलेल्या सी.सी.टिव्ही च्या आधारे पोलिसांनी शोध सुरु केला. पहाटे एका दुचाकीवरुन एक व्यक्ती आणि मुलगी आंबेवाडीच्या दिशेनं गेल्याचं आणि काही वेळानं तोच दुचाकी स्वार एकटाच पर आल्याचं त्या सीसीटीव्हीत कैद झालं. याचसोबत पोलिसांनी समांतर तपासही सुरु केला, त्यात ती मुलगी कॉलगर्ल असल्याचं समोर आलं.

दलालांकडे चौकशी

कॉलगर्ल पुरवणारे रॅकेट, वेश्या व्यवसायातील काही दलाल यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली होती. तरुणीचा फोटो दाखवल्यानंतर ती रूपा नावाची कॉलगर्ल असल्याची खात्री झाली. ती पश्‍चिम बंगालमधील रहिवासी होती. पोलिसांनी एका एजंटला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली, तेव्हा दि. २१ रोजी रूपाला एजंटामार्फत बोलवून घेणारा तरुण म्हणजे शिवाजी पेठेत राहणारा अक्षय शिंदे असल्याची माहिती पुढे आली.

अक्षय- रुपाचं प्रेमप्रकरण

२0१४ पासून रूपावर अक्षय शिंदे प्रेम करत होता. ते यापूर्वी अनेक वेळा रात्री भेटले होते. 'या व्यवसायातून तू बाहेर पड, आपण दोघे लग्न करून सुखाने संसार करू,' असं अक्षय रूपाला सांगत होता.  मात्र रूपा अक्षयबरोबर लग्न करण्यास तयार नव्हती. त्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. सोमवारी रात्री अक्षय शिंदेने एजंटला फोन करून रूपाला आपल्या शिवाजी पेठेतील घरी बोलवून घेतले. अक्षयच्या घरी त्याची आई होती. आई झोपल्यानंतर रात्री १ वाजता रूपा अक्षयकडे आली. त्यावेळी अक्षयने रूपाला माझ्याशी लग्न कर, अशी विनंती करून तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र रूपा त्याचे काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

पहाटे बाईकवरुन शिवाजीपुलावर

पहाटे पाच वाजता ते दोघे दुचाकीवरून घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते दोघे वाशी नाका येथे गेले; मात्र तेथे थांबण्यासाठी जागा नसल्याने परत शिवाजी पुलावर आले. तेथून पन्हाळा रोडवर आंबेवाडी पेट्रोल पंपाच्या अलीकडे पाटील महाराज समाधीपासून काही अंतरावर आले. त्यावेळी सकाळचे ६.१0 वाजले होते.  वारंवार सांगूनही रूपा लग्नास तयार होत नाही, असे लक्षात आल्यानंतर अक्षयने चिडून कोयत्याने रूपावर २२ ते २५ वार केले. ती मयत झाल्याचे समजल्यावर रक्ताने माखलेला कोयता घटनास्थळापासून काही अंतरावर लपवून ठेवून त्याने पलायन केले.

कॉलगर्लची कमाई

एजंटामार्फत निवडक ग्राहकांकडे जाणारी रूपा ८ ते १0 हजार रुपये घ्यायची. तिला दिवसाला किमान पाच हजार रुपये मिळत होते. त्यामुळे तिला पैशाची चटक लागली होती. अशा परिस्थितीत अक्षयबरोबर लग्न करण्यासाठी ती तयार नव्हती. हाच राग अक्षयला येत होता.

 

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सायबर सेल आणि सीसीटीव्ही फुटेजचा वापर केला. त्यामुळेच ४८ तासांत पोलिसांनी तपास करून अक्षय शिंदेला अटक केली.