कोल्हापूर: सैन्यात भरती करण्याच्या नावाखाली लुटणाऱ्या रॅकेटची नावं कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागली असून आता त्यापुढील कारवीला वेग आला आहे. या प्रकरणात कोल्हापूरातीलच एका तरुणाची सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असून, त्यासाठी आसाममध्ये खोटी परीक्षा घेऊन सैन्य भरतीची बनावट कागदपत्रही देण्यात आली होती.


फसवणूक झालेल्या तरुणाच्या चुलत मामानेच आसाम रायफलमध्ये भरती करुन देतो असं सांगत त्याच्याकडून सहा लाख रुपये उकळले. भाच्याकडून वेळोवेळी पैसे घेत या मामानं चुकीच्या मार्गानं सातत्यानं भाच्याची फसवणू केली आणि त्याला लाखोंचा गंडा घातला. इतकंच नव्हे, तर भाच्याला त्यानं बनावट प्रमाणपत्रही दिली.


फसवणूक झाल्याचं लक्षात येताच भाच्यानं पोलिसांत सदर प्रकरणी तक्रार दाखल केली. ज्यानंतर तपासाला वेग आला आणि मामा दत्तात्रय सुतार याला त्याचा साथीदार शिवाजी कदम याच्यासह करवीर पोलिसांनी अटक केली.


अटक करण्यात आल्यानंतर या दोघांच्याही नावे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. असं असलं तरीही हे प्रकरण इथच संपलं नसून सैन्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांचं हे जाळं मोठं असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. राज्यातील अनेक तरुणांना चुकीची आणि खोटी प्रमाणपत्र देत त्यांची फसवणूक केली जाते. याच धर्तीवर पोलिसांनी नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा दिला आहे.



कोणत्याही अफवांना बळी पडू नका असा सावधगिरीचा इशारा पोलिसांकडून नागरिकांना देण्यात येत असून, आता नेमकं हे जाळं कुठवर पसरलं आहे याचा छडा लावण्याचं काम पोलीस यंत्रणांनी हाती घेतलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अशी कोणतीही रेजिमेंट नसून, भरतीची चुकीच्या पद्धतीनं झाल्याचं लक्षात येताच काही तक्रारदारांच्या सांगण्यावरु करवीर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हाती एक- दोन व्यक्तींची नावं समोर आली आहेत. परिणामी हे या रॅकेटचं मूळ कुठे आहे याचाच तपास केला जात आहे.