कोल्हापूर: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचा रथत्सोव सोहळा मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भाविकांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार सुनील तटकरे यांनी देवीचा रथ ओढून, सोहळ्याला रंगत आणली.


भाजपा सरकारला सदबुद्धी दे असं साकडं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अंबाबाईला घातलं.

फुलांच्या पायघड्या ... आकर्षक आणि नयनरम्य रांगोळी... आकाशात उडणारे फटाके आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात, करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावात पार पडला.

या सोहळ्याला गेल्या 143 वर्षाची परंपरा आहे. जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देवी भक्तांच्या भेटीला बाहेर पडते, अशी या मागची आख्यायिका आहे.



रांगोळ्यांनी सजलेल्या मार्गावरून चांदीच्या रथातून देवीची नागरप्रदक्षिणा पूर्ण होते. हा सोहळा पाहण्यासाठी देवीचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हल्लाबोल आंदोलन सुरु आहे. त्या निमित्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि आमदार सुनील तटकरे हे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. काल देवीच्या रथोत्सवात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहभाग घेऊन, अंबाबाईचा चांदीचा रथ ओढला.

यावेळी आई अंबाबाई तू भाजपा  सरकारला सदबुद्धी दे असं साकडं अजित पवारांनी अंबाबाईला घातलं.

अंबाबाईची मूर्ती चांदीच्या रथात विराजमान करुन, मंदिराला प्रदक्षिणा घालून नगर प्रदक्षिनेला बाहेर पडते. मंदिरातून महाद्वार रोड.. गुजरी... भवानी मंडप... बिनखांबी गणेश मंदिर रोड मार्गे पुन्हा मंदिरात येते. या रथोत्सव सोहळ्याला हजारो भाविक सहभागी होत असतात.