पँटच्या खिशात मोबाईलचा स्फोट
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 01 Apr 2018 08:44 PM (IST)
वाढते तापमान कारणीभूत असल्याचा अंदाज काहींनी वर्तवला आहे. मात्र मोबाईल स्फोटाचे नेमके कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
जळगाव : मोबाईल वापरासंदर्भात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पॅन्टच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना जळगावातील शनिपेठ भागात घडली. या दुर्घटनेत 42 वर्षीय विकार शफुल्ला खान जखमी झाले असून, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नेमकी काय घटना घडली? शनिपेठ भागातील काट्याफईल येथे राहणारे 42 वर्षीय विकार शफुल्ला खान हे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अंघोळ करुन कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यावेळी जिन्यातच त्यांच्या पँटच्या खिशात असलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. एमआय कंपनीचा हा मोबाईल होता. या दुर्घटनेत विकार शफुल्ला खान यांची मांडी भाजल्याने ते जखमी झाले. त्यांना तातडीने सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाढते तापमान कारणीभूत असल्याचा अंदाज काहींनी वर्तवला आहे. मात्र मोबाईल स्फोटाचे नेमके कारण अद्याप कळू शकलेलं नाही.