कोल्हापुरात पुजाऱ्याला मारहाण करणाऱ्या 10 गुंडांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2016 03:20 PM (IST)
कोल्हापूर : कोल्हापूरच्या रेणुका मंदिरात पुजाऱ्याला मारहाण करणाऱ्या गावगुंडांना अखेर अटक करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दहा जणांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. रेणुका मंदिरात भक्तांनी दान केलेले पैसे जबरदस्तीने घेताना अडवणूक केल्याने मंदिराच्या पुजाऱ्याला गुंडांनी जबर मारहाण केली होती. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा सर्व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कोल्हापुरातील जवाहर नगर परिसरात देवी रेणुकाचं जागृत मंदिर आहे. या मंदिरात दररोज भाविकांची गर्दी असते. मंगळवारी देवीचा वार असल्यानं भाविक मोठ्ठी गर्दी करतात. देवीसाठी भक्तांनी दान केलेले पैसे याच परिसरातील काही गुंड मंदिरात येऊन जबरदस्तीनं घेऊन जातात.