Heavy Rain Kokan Updates : कोकणात पावसाचं धुमशान पाहायला मिळतं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस संततधार पाऊस सुरू आहे. सह्यादीच्या खोऱ्यात तर मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला सलग तिसऱ्या दिवशीही पूर आला. निर्मला नदीला पूर आल्याने ब्रिटिश कालीन आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याने 27 गावांचा संपर्क तुटला आहे. सलग तीन दिवस आंबेरी पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरून येजा करणाऱ्या वाहनचालकांना याचा फटका बसत आहे. 


27 गावांचा संपर्क तुटला


सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर पूर ओसरायला सुरवात झाल्याने काही अती उत्साही वाहनचालक पुलावर पाणी असताना देखील गाड्या घेऊन जात आहेत. आपला जीव धोक्यात घालून वाहनचालक या पुलावरून गाड्या चालवत आहेत. निर्मला नदीला तिसऱ्या दिवशीही पूर असून 27 गावांचा संपर्क तुटला आहे. कणकवली तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे कणकवली आचरा रस्ता सोमवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी काही काळ पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 


रस्ता खचल्याने करूळ घाट वाहतुकीसाठी बंद


कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट रविवारी रात्री खचला असून करूळ घाटरस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. गगनबावड्यापासून अंदाजे 5 किमी अंतरावर वळणावर दरीच्या बाजूने सुमारे 50 फूट लांब आणि 8 फूट रुंद रस्ता खचला आहे. रस्त्याखालील भाग पूर्णपणे ढासळून गेल्यामुळे करूळ घाटरस्ता धोकादायक बनला आहे. रस्ता खचल्याची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी जात वाहतुकीस रस्ता बंद केला. दुरुस्ती होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दुचाकी तसेच चारचाकी हलकी वाहने भुईबावडा घाटमार्गे तर अवजड वाहतूक फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली आहे. वाहनचालकांनी याची दखल घेत सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याशिवाय रघुवीर घाटामध्ये दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. संततधार पावसामुळे वाहतूक सुरळीत करण्यास वेळ लागणार आहे.




पाच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली


रत्नागिरी जिल्ह्यातील 8 प्रमुख नद्यांपैकी 5 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. इशारा पातळीवरून वाहत आहेत. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. तर खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्यावर अर्थात 7.5 मिटर, संगमेश्वरमधील शास्त्री नदी, बावनदी, राजापूरची कोदवली नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. तर, काजळी नदीची पाणी पातळी धोका पातळीच्यावर म्हणजे 18.43 मिटर इतकी आहे. काजळी नदीला पूर आल्याने लांजा - काजरघाटी - रत्नागिरी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मंडणगड, रत्नागिरी - मंडणगड तालुक्यातील  अंबवणे गावचा रस्त्यावर मध्यरात्री दरड कोसळली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी एक वस्तीची एसटी गाडी अडकून पडली आहे. बांधकाम विभागाकडून  दरड काढण्यासाठी  कुमक आणि यंत्र सामग्री पाठवण्यात आली आहे.


रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी


रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पण सध्या बरसणारा पाऊस हा काहीशी विश्रांती घेऊन बरसत आहे. प्रमुख नद्या आत्ताच्या घडीला दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठची भात शेती पाण्याखाली गेली आहे. भागातील ओढ्यांना पूर आल्यामुळे तिथल्या जन जीवनावरती त्याचा काहीसा परिणाम झालेला दिसून येतो.