मुंबई : रस्त्यामार्गे कोकणात जाणाऱ्या वाहतूकदारांना मुंबई-पुणे महामार्गावर मिळालेलं टोलसवलतीचं आश्वासन प्रत्यक्षात उतरत आहे. वाहनचालकांना कोल्हापूरपर्यंत टोल-फ्री पास देण्यास सुरुवात झाली आहे.
वाहनधारकांचं आरसी बूक, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. मात्र परतीच्या मार्गाचा पास मिळत नसल्यामुळे कोकणवासियांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच परतीच्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर 2 ते 4 सप्टेंबर या कालावधीत टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय एमएसआरडीसीनं घेतला आहे.
संबंधित वाहन चालकांना आपल्या गाडीचा क्रमांक, स्थानिक पत्ता यांचा पुरावा द्यावा लागणार आहे. तसेच कोकणात जाणाऱ्या घराचा पत्ताही द्यावा लागणार आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या पास धारकांनाच मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर टोल सूट मिळणार आहे.
गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांकडून टोल वसुली करु नये: नितेश राणे
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकडून टोल वसुली करण्यात येऊ नये अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली होती.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे लोक पनवेल– पुणे– सातारा– कोल्हापूर मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर टोल माफी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती.