मूकमोर्चाबद्दल मराठा समाजाचे आभार : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 02 Sep 2016 03:20 AM (IST)
मुंबई: कोपर्डी बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं. रिपाइं नेते रामदास आठवले यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपद मिळाल्यानं काल मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. "कोपर्डीची घटना अत्यंत गंभीर आहे. त्याविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी मराठा समाजाने विराट मोर्चे काढले. लाखो लोकांनी घटनेचा निषेध केला. हे मोर्चे म्हणजे आक्रोश आहे. त्याचा दुसरा कोणताही अर्थ काढू नये. कोणतीही भाषणबाजी न करता, संयमाने मूक मोर्चे काढून त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. त्याबद्दल आयोजकांचे आभार", असं मुख्यमंत्री म्हणाले. काहींचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न मात्र या मोर्चातून काही जण राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. "मराठा समाजाने आपली शक्ती दाखवत असताना, आपली ताकद दाखवत असताना, त्यांनी संयम पाळला. त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आयोजकांना मी यासाठी धन्यवाद देतो, कारण काही लोकांना याचं राजकारण करायचं होतं, त्यांना यापासून रोखलं. आजही अनेकजण प्रयत्न करत आहेत, या मोर्चाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजता येईल का, हे पाहात आहेत", असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. अशा मोर्चातून राजकीय पोळी भाजण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न होता, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं नाव न घेता जोरदार टीका केली आहे. आया-बहिणींच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध "मराठा समाजाने जी ताकद दाखवली, जो संयम दाखवला, तो यापुढेही कायम राहिल, असा विश्वास आहे. पण सरकारही हा आक्रोश निश्चितपणे समजून घेईल. ते सरकारचं काम आहे. आया-बहिणींची सुरक्षा झालीच पाहिजे. यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. नेत्यांनी तेढ निर्माण करु नये या देशातील, महाराष्ट्रातील नेत्यांनी समाजात तेढ निर्माण होणार नाही, महाराष्ट्रात दलित-सवर्ण वाद होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता पवारांना दिला. "सत्ता येते जाते, पण माणसांमध्ये भांडणं लावून सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधत असाल, तर त्याचा तात्कालिक फायदा होईल. पण त्यामुळे देशाचा, महाराष्ट्राचा किंवा समाजाचा फायदा होणार नाही", असं मुख्यमंत्री म्हणाले. आमचा बाप छत्रपती शिवाजी "हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा आहे, ज्यांनी बहुजनांचा विचार केला. हा महाराष्ट्र ज्योतिबा फुल्यांचा आहे, हा महाराष्ट्र घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि हा महाराष्ट्र आमचा बाप असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, ज्यांनी कधी जात-पात न पाहता रयतेच्या भल्याचा विचार केला, त्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे", असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाषणाचा शेवट केला.