मुंबई : कोकण विधानपरिषदेसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा दिला आहे. थोड्याच वेळात नारायण राणे यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहेत.
नारायण राणे यांनी कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची तातडीने बैठक बोलावली आहे.
कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवार उभा करावा, असा प्रस्ताव भाजपने दिला होता. मात्र, नारायण राणेंनी स्वत:च्या पक्षाचा उमेदवार उभा न करता, अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेसमोरच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत.
कोकणात यापूर्वीच शिवसेनेकडून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आता कोकण विधानपरिषद निवडणूक शिवसेना विरुद्ध राणे आणि तटकरे अशी होईल. कोकणातले दोन दिग्गज नेते एकत्र आल्याने शिवसेनेसमोरील आव्हान वाढणार आहे.
अनिकेत तटकरे कोण आहेत?
अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांचे सुपुत्र आहेत. अनिकेत तटकरे यांची बहीण आदिती तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. अनिकेत तटकरे ज्या जागेवरुन विधानपरिषदेसाठी लढत आहेत, त्या जागेवरुन यापूर्वी त्यांचेच काका अनिल तटकरे हे आमदार होते. अनिल तटकरे यांची कार्यकाळ संपल्यानंतर आता सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना या जागेवरुन उमेदवारी मिळाली आहे.
कोकण विधानपरिषद : राणेंचा अनिकेत तटकरेंना पाठिंबा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 May 2018 09:22 AM (IST)
कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवार उभा करावा, असा प्रस्ताव भाजपने दिला होता. मात्र, नारायण राणेंनी स्वत:च्या पक्षाचा उमेदवार उभा न करता, अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -