बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीच्या मृत्यूची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिशा सालियन प्रकरणावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मंत्री जयकुमार गोरे आणि किरीट सोमय्यांचा दाखला देत जोरदार प्रत्युत्तर दिले. या प्रकरणांची चौकशी का होत नाही? अशी विचारणा त्यांनी केली.
जयकुमार गोरेंचे उघडे, नागडे फोटो सभागृहात आले
अनिल परब म्हणाले की, किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, जयकुमार गोरेंचे उघडे, नागडे फोटो सभागृहात आले. मात्र, त्याची चौकशी केली जात नाही. विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून कसही दाबू नका, असे परब म्हणाले. त्यांनी सांगितले की, कायद्यानं आदित्य ठाकरे यांचं कायद्यानं जे काय व्हायचं ते होईल. आदित्य ठाकरेंची केस किती दिवस चालू आहे. सीबीआय चौकशी सुरु आहे, एसआयटी आहे, सीआयडी चौकशी सुरू आहे.सगळे विषय बाजूला जावे म्हणून हे सुरु आहे का? अशी विचारणा त्यांनी केली.
सरड्याला पण लाज वाटली
अनिल परब म्हणाले की, मनिषा कायंदे यांचे ट्विट वाचून दाखवतो. सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं. मनिषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला, सरड्याला पण लाज वाटली. जयकुमार गोरे यांच्याबद्दल कोणी बोलत नाही, घ्या ना त्याचा राजीनामा, असे आव्हान त्यांनी दिले. विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून काहीही वागायचं, किरीट सोमय्याचा व्हीडिओ दिला होता त्याची चौकशी का नाही केली? अशी विचारणा त्यांनी केली. कामकाजाबद्दल जे विरोधी पक्षनेते बोलले ते बरोबर आहे. सभापती हे सर्व पक्षांचे होतात, असे ते म्हणाले.
आता औरंगजेबाच्या सुटकेसाठी दिशाची मदत घेत आहेत
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "शिवसेना आक्रमकपणे राज्याचे प्रश्न मांडत आहे, त्यामुळे आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिशा सालियनच्या वडिलांच्या मागे कोणीतरी आहे. राज्यात औरंगजेबाचा दाबण्यासाठी आता आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राऊत म्हणाले की, हा अपघात होता. पाच वर्षांनी याचिका दाखल केली, त्यामागे काय राजकारण होते. या लोकांना औरंगजेबाची कबर खणायची होती, पण औरंगजेब त्यांच्या खांद्यावर बसला. आता औरंगजेबाच्या सुटकेसाठी दिशाची मदत घेत आहेत."
माजी गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, "मी दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची माहिती गोळा करत आहे आणि त्याची प्रत मागितली आहे. त्याचप्रमाणे हे सुरू असलेले प्रकरण मला राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून दिसत आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आमदार रोहित पवार म्हणाले, "जर एखादी व्यक्ती आपल्या मुलीसाठी न्याय मागण्यासाठी न्यायालयात जात असेल, तर आपण न्यायालयाचा निर्णय स्वीकारला पाहिजे. मात्र या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव असून त्यांचा आणि या प्रकरणाचा कोणताही संबंध नाही."
दिशाच्या वडिलांनी याचिकेत काय म्हटले आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेत उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे, चित्रपट अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. एवढेच नाही तर तत्कालीन पोलीस आयुक्त आणि मुंबईचे महापौर यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दिशाचा 2020 मध्ये मृत्यू
दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी दिशाचा मुंबईतील घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता.