मुंबई : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं विद्यमान खासदारांच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला जात आहे. आपल्या खासदाराने संसदेत किती वेळा स्थानिक प्रश्न मांडले, किती वेळा हजेरी लावली, मतदारसंघात किती निधी खर्च केला, याची उत्सुकता मतदारराजाला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त खासदार निधी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी वापरला, तर अल्प खासदार निधी वापरणाऱ्या खासदारही भाजपच्याच आहेत, त्या म्हणजे प्रीतम मुंडे.
भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी सर्वाधिक म्हणजे 100% खासदार निधी वापरल्याचं समोर आलं आहे. सोमय्या यांनी खासदार निधीतले संपूर्ण 25 कोटी रुपये वापरले. तर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी 25 कोटींपैकी फक्त 7.32 कोटी खासदार निधी वापरला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या.
सर्वाधिक निधी वापरणाऱ्या महाराष्ट्रातील टॉप 5 खासदारांमध्ये भाजपचे चौघे आहेत, तर एक शिवसेनेचा आहे. त्यापैकी दोघे जण मुंबईतील खासदार आहेत. तर राज्यातील सर्वात कमी निधी वापरणाऱ्या पाच खासदारांमध्येही भाजपचे तिघे, शिवसेना-राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक खासदार आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रश्न विचारुन यंदा संसदरत्न पटकवणाऱ्या सुप्रिया सुळेही कमी खासदार निधी वापरणाऱ्यांच्या यादीत आहेत.
राज्यात सर्वात जास्त निधी वापरणारे खासदार
किरीट सोमय्या 25 कोटी - ईशान्य मुंबई (भाजप)
रामदास तडस 23.57 कोटी - वर्धा (भाजप)
श्रीकांत शिंदे 20.34 कोटी - कल्याण (शिवसेना)
हीना गावित 20.23 कोटी - नंदुरबार (भाजप)
पूनम महाजन 20.22 कोटी - उत्तर मध्य मुंबई (भाजप)
राज्यात सर्वात कमी (50 टक्क्यांपेक्षा कमी) निधी वापरणारे खासदार
प्रीतम मुंडे 7.32 कोटी - बीड (भाजप)
भावना गवळी 10.55 कोटी - यवतमाळ वाशिम (शिवसेना)
रावसाहेब दानवे 10.67 कोटी - जालना (भाजप)- प्रदेशाध्यक्ष
रक्षा खडसे 10.89 कोटी - रावेर, जळगाव (भाजप)
सुप्रिया सुळे 12.65 कोटी - बारामती (राष्ट्रवादी)
उदयनराजे भोसले 12.46 कोटी - सातारा (राष्ट्रवादी)
महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, राजीव सातव, श्रीरंग बारणे, धनंजय महाडिक, हीना गावित या लोकसभा खासदारांना आणि राज्यसभा खासदार असलेल्या रजनी पाटील यांना संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. संसदेत अभ्यासपूर्ण कामगिरी करणाऱ्या, सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना हा सन्मान दिला जातो.
भाजप खासदार सोमय्यांनी सर्वाधिक निधी वापरला, अत्यल्प वापरणारे पाच कोण?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Mar 2019 02:40 PM (IST)
भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी सर्वाधिक म्हणजे 100% खासदार निधी वापरल्याचं समोर आलं आहे. सोमय्या यांनी खासदार निधीतले संपूर्ण 25 कोटी रुपये वापरले. तर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी 25 कोटींपैकी फक्त 7.32 कोटी खासदार निधी वापरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -