रायगड : पंजाब नॅशनल बँकेत सुमारे 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करुन फरार झालेल्या नीरव मोदीला राज्य सरकार आज मोठा दणका देणार आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये असलेला नीरव मोदीचा अवैध आलिशान बंगला आज डायनामाईटने जमीनदोस्त करण्यात येणार आहे. यासाठी बंगल्यात 100 डायनामाईट लावले आहेत. सकाळी हा बंगला पाडला जाईल.


अलिबागच्या किहिम समुद्रकिनाऱ्याजवळ सुमारे 30 हजार चौरस फुटांचा नीरव मोदीचा बंगला आहे. त्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. अवैधरित्या कमावलेल्या संपत्तीमधून हा बंगला बांधण्यात आला आहे. या आलिशान बंगल्यात नीरव मोदी मोठमोठ्या पार्टी आयोजित करत असे.

अलिबागमधील बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाईसाठी प्रशासनाकडे पैसेच नाहीत

मुंबई उच्च न्यायालयाने हा अवैध बंगला पाडण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर प्रशासनाने बंगल्याची तोडफोड सुरु केली. पण त्यानेही बंगला न पडल्याने बुलडोझर वापरण्यात आला. तरीही बंगला पडत नसल्याने प्रशासनाने स्फोटकं वापरुन बंगला जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. तीन ड्रील मशिनद्वारे आधी बंगल्याच्या खांबांमध्ये छेद केला जाईल. त्यानंतर डायनामाईटने बंगला जमीनदोस्त करण्यात येईल.

27 जानेवारीला काम थांबवलं
नीरव मोदीचा आलिशान बंगला जमीनदोस्त करण्याचं काम 27 जानेवारीला थांबवण्यात आलं होतं. बंगल्यामधील मौल्यवान वस्तू सुरक्षित बाहेर काढून मोदीच्या संपत्तीमधून अधिकाधिक रकमेची भरपाई व्हावी, यासाठी प्रशासनाने काम थांबवलं होतं.

बेकायदेशीर बंगला कोणाचाही असो, कारवाई झालीच पाहिजे : हायकोर्ट

हायकोर्टाने फटकारल्यानंतर कारवाई
अलिबाग किनाऱ्यावरील बेकायदा बंगल्यांवर कारवाई न करताच त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले होते. फरारी व्यापारी नीरव मोदीसह बॉलिवूडमधील कलाकारांच्या अनधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवण्याचे आदेश देऊनही राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याने हायकोर्टाने महसूल विभागालाही झापले होते. हायकोर्टाने फटकारल्यानंतर नीरव मोदीच्या बंगल्यावर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

अलिबागमधील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई, नीरव मोदीच्या बंगल्यावरही हातोडा