Sanjay Raut : गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्यांवरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सामना रंगला आहे. वेगवेगळ्या मुद्यावरुन दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करताना दिसतायेत. अशातच संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) फरार असल्याचा दावा केला आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत सोमय्या हे त्यांच्या मुलासह फरारी असल्याचा दावा केलाय. तसेच हे दोघे मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.


दरम्यान, किरीट सोमय्या आणि मेहूल चोकसी याची जुनी दोस्ती आहे. मेहूल चोकसी जिथे आहेत, तिथे तरी सोमय्या गेले नाहीत का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. या लोकांनी जनतेचा पैसा लुटला आहे. कारवाईच्या भितीने हे लोक देशाबाहेर पळून जाण्याची भिती वाटत आहे. यांची माफिया टोळी आहे. या प्रकरणावर भाजप काहीही बोलत नाहीत. विक्रांत प्रकरणी घोटाळ्याला भाजपचे समर्थन आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती राज्य आणि देशव्यापी आहे. अजून काही प्रकरणे बाहेर पडतील असा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे.


ट्वीटमध्ये नेमकं काय म्हणालेत संजय राऊत


किरीट सोमय्या हे मुलासह फरार झाले आहेत. न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली तरी सत्याचाच विजय होईल असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. प्रश्न इतकाच आहे की, हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं आता राऊतांच्या या वक्तव्यावर सोमय्या काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


 






दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या  यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 11 एप्रिल म्हणजेच, आज सुनावणी पार पडणार आहे. 


आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी अटक टाळण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. संजय राऊतांनी याप्रकरणातील कागदपत्र समोर आणल्यानंतर सोमय्यांविरोधात नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, याव्यतिरिक्त किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या आणि इतर यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधातील फसवणुकीचा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.