मुंबई: भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिलेली मोठी जबाबदारी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाकारली आहे. निवडणुकीसाठी कॅम्पेन कमिटीचा सदस्य म्हणून किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya) नियुक्ती भाजपकडून करण्यात आली होती. पण आपण 2019 पासून पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे विनम्रपूर्वक ही जबाबदारी नाकारतो असं पत्र किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलंय. त्यानंतर आज(बुधवारी) एबीपी माझाशी बोलताना किरीट सोमय्यांनी मी कार्यकर्ता म्हणून या पेक्षा जास्त कार्य करतो आहे असं म्हटलं आहे.
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काल भाजपने त्यांना दिलेली विधानसभेसाठीची जबाबदारी नाकारली आहे. भाजपने काल विधानसभा निवडणूक २०२४ साठी व्यवस्थापन कमिटी घोषित केली आहे. यात सोमय्या यांना निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.मात्र याला सोमय्या यांनी नकार दिला. मी कार्यकर्ता म्हणून या पेक्षा जास्त कार्य करतो आहे, मग हे कमिटी सदस्यचे शेपूट कशाला असा सवाल उलट त्यांनीच पक्षाला विचारला आहे. फडणवीस यांनी मला उध्दव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतून जाण्यास सांगितले, तेव्हापासून आपण पक्षाचे अविरत कार्य करीत असून करीत राहणार असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले किरीट सोमय्या?
मी पक्षाचं काम करीतच आहे, याची जाणीव पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. मी इतरांपेक्षा दहा पट जास्त काम करत आहे. याच्यात पदाची काही गरज नाही, ते लागणार नाही. १८ फेब्रुवारी २०१९ ला अमित शाह, उध्दव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उध्वव ठाकरेंनी किरीट सोमय्या असेल तर मी येणार नाही असं म्हणाले, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी मला त्या पत्रकार परिषदेतून निघून जायला सांगितलं तेव्हापासून आजपर्यंत किरीट सोमय्या एक मिनीट देखील स्वस्थ बसला नाही. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे, आणि काम करतच राहणार, असंही पुढ किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले आहेत.
त्यामुळे कोणत्याच कमिटी सदस्यचे शेपूट नको, हे मी पक्षांच्या नेत्यांना सांगितलं आणि ते शेवटी त्यांनी मान्य केलं. तर नाराजीच्या प्रश्नावर बोलताना किरीट सोमय्या बोलताना म्हणाले, वास्तविक रित्या ते गरज नाही, मी डबल काम करतोय मग एखाद्या कमिटीचं सदस्य कशाला, आणि आत्ता कशाला असा सवाल देखील त्यांनी एबीपीच्या माध्यमातून पक्षाला केला आहे. मी काम करतोय ना, सामान्य कार्यकर्त्यांचं जे वजन असतं पक्षात ते बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त आहे, ते किरीट सोमय्याने सिध्द केलं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
संबधित बातम्या- Kirit Somaiya : भाजपकडून किरीट सोमय्यांना निवडणुकीत मोठी जबाबदारी; पण, सोमय्यांचा हात जोडून नकार
Video - Kirit Somaiya : कार्यकर्ता म्हणून जास्त काम करतो, मग कमिटीचं शेपूट कशासाठी? सोमय्यांचा पक्षाला सवाल