नागपूर : नागपूरच्या रेशीमबाग स्मृती मंदिरात भाजप आमदारांच्या कार्यशाळेला गैरहजर राहणाऱ्यांना भाजप नोटीस बजावणार आहे. तशी माहिती आज नागपुरात पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.


आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यासह दिग्गज नेते रेशीमबागेत दाखल झाले. मात्र, यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि वेगळ्या विदर्भाचा नारा देणारे आशिष देशमुख मात्र गैरहजर होते.

कोण कोण अनुपस्थित?

  1. एकनाथ खडसे (माजी महसूलमंत्री)

  2. रणजित पाटील (गृहराज्यमंत्री)

  3. आशिष देशमुख (आमदार)


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाने कार्यशाळेला अनुपस्थित राहिलेल्यांना नोटीस तर बजावणार आहे, मात्र नेमकी कारवाई काय करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण अनुपस्थित राहणाऱ्यांमध्ये खडसेंसारखे ज्येष्ठ नेतेही आहेत.

यात आणखी एक विशेष बाब म्हणजे, खडसे, रणजित पाटील किंवा आशिष देशमुख अनुपस्थित राहिले असले, तरी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे पदुम मंत्री महादेव जानकर हे मात्र उपस्थित होते.

दरम्यान, वेगळ्या विदर्भाची मागणी करत भाजप आमदार आशिष देशमुखांनी तर राजीनाम्याचाही इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात काय हालचाली होतील, याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह सर्वांनाच लागली आहे.