Pune News :    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण चौपाटी आणि सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. उद्या (15 मे) दुपारी 2.00 वाजेपर्यंत ही दोन्ही ठिकाणे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. हवेली पोलीस आणि वनविभागाने याबाबत कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे ही कारवाई करण्यात आल्याने पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह खडकवासला धरणाला लागून असलेल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीला (DIAT) भेट देणार आहेत. वीकेंडमुळे खडकवासला आणि सिंहगड परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि परिणामी संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून खडकवासला चौपाटी आणि सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.


सिंहगडचे वनसंरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी सांगितले की, सिंहगड आज दुपारी 12.30 ते उद्या दुपारी 2.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. पोलिस प्रशासनाकडून सूचना आल्यानंतर यात थोडा बदल होऊ शकतो, असं सांगितलं आहे तर “खडकवासला चौपाटी उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सुरक्षेचा आढावा घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. पर्यटक आणि नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे,’ अशी माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.


गर्दी आणि वाहतूक कोंडी


पुण्यातील पर्यटकांचा किंवा टेकर्सला हक्काचा किल्ला म्हणजे सिंहगड. याच सिंहगडाच्या चौपाटीवर आणि किल्ल्यावर शेकडो लोकं रोज जात असतात. अनेक लोक विरंगुळा म्हणून जातात. तर अनेक लोक व्यायामासाठी आणि ट्रेकिंगसाठी रोज जात असतात. त्यामुळे या मार्गावर पहाटे आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे वाहतूक कोंडीदेखील पाहायला मिळते.  त्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासोबतच सुरक्षेच्या मुद्द्यामुळेदेखील बंद ठेवणार आहे.


फेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीला भेट देणार


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे  डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमध्ये भेट देणार आहेत आणि या इन्स्टिट्यूटकडून बॅटरी, संवाद प्रणाली, रडार, क्वांटम तंत्रज्ञान, ऊर्जा अशा क्षेत्रांमध्ये करण्यात येत असलेल्या या संशोधनांचे सादरीकरण उद्या होणाऱ्या पदवीप्रदान कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर करण्यात येणार आहे.