मुंबई : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल यांना समर्थन देणाऱ्यांची मानसिकता तालिबानी असल्याची टीका केली, त्यानंतर आता भाजपा आक्रमक झाला आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना पत्र लिहून हिंदूंची बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर चर्चेसाठी खुले आव्हानही दिलं आहे.
नितेश राणे यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय
नितेश राणे यांनी पत्रात म्हटलं आहे की, भारत भूमी ही आपली माता आहे. आजवर मुघल- अफगाणी अशा अनेक परकीय आक्रमणांचे दाह या भारतमातेने सहन केले आहेत. हिंदूधर्मावर, हिंदुसंस्कृतीवर आणि धर्मस्थळांवर वारंवार हल्ले करुन ते नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. तरी विशाल ह्रदय दाखवत आक्रमणकाऱ्यांनाही भारतभूमीनं समावून घेतलं. त्यांच्या कलाकृतींचे, साहित्य संस्कृतीचे जतन व संवर्धनही केले. त्यामुळेच आज या देशात अनेक पंथ, धर्म, संस्कृती आणि भाषा वाढल्या आणि नांदल्या. विशेषत: उर्दू लेखनाच्या तुमच्या कौशल्याचं भारतवासीयांनी नेहमी कौतूकच केलेलं आहे. धर्मविस्ताराच्या नावाखाली तलवारीच्या जोरावर एकाही हिंदू राजानं आजवर कुठल्याही देशावर आक्रमण केले नाही, असं राणे यांनी म्हटलं आहे.
नितेश राणे यांनी म्हटलं आहे की,एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत तुम्ही तालीबान्यांची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी करणं हा एक सुनियोजित षडयंत्राचा भाग वाटतोय. कारण ही तुलना करताना तुम्ही तालीबानी प्रवक्त्यासारखी भूमिका घेत कुटनितीनं त्यांची तुलना हिंदुत्वाशी करताय. मला खरंतर हेच समजत नाही की तुम्हाला हिंदूधर्माविषयी एवढा राग का आहे? कदाचित कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या तुमच्या सासरवाडीचा तुमच्यावर चांगलाच प्रभाव पडलेला दिसतोय, असं राणे यांनी म्हटलं आहे.
Javed Akhtar Controversy: जावेद अख्तर यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी
राणे यांनी म्हटलं आहे की, हिंदूत्त्व मुळातच एक समतोल जीवनशैली आहे. सर्वप्रकारच्या उपासना पद्धती व श्रद्धांना इथं स्थान आहे. त्यामुळेच सहिष्णूता आणि घर्मानिरपेक्षता इथल्या हिंदूचा स्थायी स्वभाव आहे. त्यामुळंच तर सुप्रीम कोर्टानंही सांगितलंय की हिंदू ही एक जीवनपद्धती व शैली आहे आणि इथल्या संस्कृतीचा गाभा आहे.
नितेश राणे पत्रात म्हणतात, जो ही व्यक्ती या देशात राहतो, तो या देशाला आपली मातृभूमी समजून प्रेम करत असेल, इथल्या संस्कृतीशी एकरूप झाला असेल तो आमच्यासाठी हिंदू आहे, मग त्याचा धर्म व उपासना पद्धती कोणतीही असेल! हीच समरसतेची विचारधारा व पद्धती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. आपण ज्या उर्दू भाषेत लोकप्रिय गीत लेखन करता ती उर्दूभाषा आपल्या गीतांनी व कवितांनी मोठी केली आहे. तिला अधिक व्यापक बनवलं आहे, यात फिराक गोरखपुरी अर्थात रघुपती सहाय, बृजमेहन कैफी, राजेंद्रसिंग बेदी, उपेंद्रनाथ अश्क अशा अनेक कवी व साहित्यिकांचे नावं घेता येतील, असं राणे यांनी म्हटलं आहे.
टीव्ही चॅनेलच्या चर्चेत तुम्ही म्हणालात की ज्या अमानुष पद्धतीने तालेबानी स्त्रियांना वागवतात त्याच पद्धतीने हिंदूही आपल्या स्त्रियांना वागवतात. खरंतर आपल्या हिंदूधर्माविषयीच्या अज्ञानावर मला दया येतेय, खरंतर आम्ही हिंदू स्त्रीशक्ती आदर आणि सन्मान करतो व त्यांची देवींच्या स्वरूपात पूजा करून नतमस्तकही होतो. तुम्हाला महिलांच्या हक्कांविषयी किती आदर आहे? हे कळून चुकलेलं आहेच, कारण तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात 'ट्रिपल तलाक' सारख्या वाईट परंपरेवर बोलण्याचं धाडस केले नाही. जी अमानुष परंपरा मुस्लीम स्त्रियांना करार केलेल्या गुलामासारखी वागणूक द्यायची. जी कुप्रथा स्त्रियांचा आत्मसन्मान पितृसत्तेच्या पायदळी तुडावयची.
मुस्लीमसांठी आपण आपल्या आयुष्यात असं काय केलं?
इस्लामोफोबीया, द्वेष, राईटविंग, फॅसीझम असे शब्द मिडीयासमोर वारंवार वापरून स्वताला फक्त चर्चेत राहायच आणि सामान्य गरिब मुस्लीम तरूणांमध्ये द्वेष पसरावयचा. पण या गरिब मुस्लीमसांठी आपण आपल्या आयुष्यात असं काय केलं आहे की ज्यामुळे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावेल? जावेद अख्तरजी,तुम्ही हा देश, हा समाज तुमच्या हस्तिदंताच्या मनोऱ्यावरुन पाहत आहात, म्हणून चुकीची मतं बनवत आहात. अन्यथा संघ परिवार समाजातील शेवटच्या माणसासाठी तसेच दुर्गम ईशान्य भागात किंवा बस्तरच्या घनदाट जंगल प्रदेशात करत असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांबद्दल तुम्हाला माहिती असती. ही ती राष्ट्रकार्यात झोकून दिलेली एक संस्था आहे.संपूर्ण देशातील शाळांपासून ते रुग्णालयांपर्यंत दीड लाखांहून अधिक सामाजिक कार्ये संघ व संघ परिवारातील संस्था चालवितात.
संघपरिवाराचा विश्वास आहे की धर्मनिरपेक्षता म्हणजे भेदभाव न करता सर्व धर्मांचा आदर करणे आणि तुमच्यासारख्या (स्युडो)छद्म धर्मनिरपेक्षांना असे वाटते की तुष्टीकरण हीच धर्मनिरपेक्षता आहे. तुमच्या सारख्या द्वेष करणाऱ्यांचे आभार मानायला हवेत कारण जितका बुद्धिभेद करुन विरोध करायचा प्रयत्न तुम्ही कराल तितक्याच वेगात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक शक्ती म्हणून राष्ट्रहितासाठी उभा राहतो.
टीव्ही शो दरम्यान वाहवाहवी मिळावी म्हणून तुम्ही खोटे विधान केले की गोळवलकर गुरुजींनी हिटलरच्या नाझीवादाचे कौतुक केले आहे, जे पूर्णपणे खोटे आहे. तुम्ही कधी गोळवलकर गुरुजींचे 'बंच ऑफ थॉट्स' हे पुस्तक वाचले असते तर तुम्ही असे कोणतेही निंदनीय विधान करण्याचं धाडस केलं नसते. घडला प्रकार संघपरिवार आणि हिंदूत्त्वाला मानणाऱ्यांची मनं दुखवणारा आहे. आम्ही तुम्हाला फक्त एका आठवड्याची मुदत देतो आहे, एकतर तुम्ही एखाद सार्वजनिक व्यासपीठ निवडा किंवा न्यूजरूम तुम्ही जे सांगितले आहे त्याचे समर्थन करण्यासाठी म्हणाल त्या व्यासपीठावर आम्ही चर्चेला तयार आहोत. असं चर्चेसाठी खुलं आव्हान नितेश राणे यांनी दिलं आहे, त्यामुळे आता जावेद अख्तर यांच्याकडून काय उत्तर मिळतं हे बघावं लागेल.