पंढरपूर : कोरोना संकटामुळे मार्चपासून कुलुपात बंद असलेल्या विठुरायाच्या मंदिराची दारे कार्तिकी यात्रेला उघडून कमीतकमी निर्बंध घालून यात्रा होऊ द्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या बैठकीत करण्यात आली. आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेला संचारबंदी लागू न करता मर्यादित वारकऱ्यांना कोरोनाचे नियम पाळून यात्रेला येऊ द्यावे, प्रत्येक मठात 50 भाविकांना उतरण्यास परवानगी द्यावी. कार्तिकी एकादशीला सकाळी बारा वाजेपर्यंत वारकऱ्यांना सोशल डिस्टन्स पाळून प्रदक्षिणा करू द्यावी, अशी विनंती या प्रस्तावात केली जाणार आहे.


विठ्ठल मंदिर गेल्या 9 महिन्यापासून बंद असल्याने कार्तिकी एकादशीला मंदिराची सर्व दारे उघडावीत आणि भाविकांना मंदिराबाहेरून देवाचे दर्शन घेता यावे अशीही मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. याबाबत शासनाने आषाढी यंत्रेप्रमाणेच निर्बंध घातल्यास मात्र वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल असा इशारा वारकरी संप्रदायाच्या बैठकीत देण्यात आला आहे.


CM Uddhav Thackeray : दिवाळीनंतर नियमावली तयार करुन मंदिरं उघडणार : मुख्यमंत्री ठाकरे


महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना सपत्नीक निमंत्रण दिले जाणार
कार्तिकी यात्रेसाठी मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत यात्रेच्या सर्व परंपरा पाळण्यासाठी शासनाला एक प्रस्ताव देण्यात आला आहे. आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेच्या महापूजेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सपत्नीक निमंत्रण दिले जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील मंदिरे बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय असल्याने कार्तिकी यात्रेसाठी 26 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी एकादशीला मंदिराच्या वतीने होणारी पद्य पूजा, नित्य पूजा व शासकीय महापूजेला मर्यादित संख्येने प्रवेश देण्यास परवानगी मिळावी. कार्तिकी यात्रेत शेकडो वर्षांपासून होत असलेले उपचार व परंपरा पाळाव्यात यासाठी राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे.


शासनाच्या भूमिकेकडे लक्ष


आता कार्तिकी यात्रेला शासन परवानगी देणार कि आषाढी प्रमाणेच संचारबंदी व कडक निर्बंध लादणार हे शासनाच्या भूमिकेवर अवलंबून असले तरी वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देत एक पाऊल पुढे टाकले आहे. सध्या ऋतू बदलामुळे कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना कार्तिकी यात्रेला परवानगी देणे धोकादायक असले तरी यात थोडी शिथीलता आणून माध्यम मार्ग स्वीकारल्यास वारकरी संप्रदाय आणि शासन यातील संघर्ष टाळता येणे शक्य होणार आहे.

Uddhav Thackeray | फटाकेबंदी पेक्षा प्रदूषण करणारे फटाके टाळा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन