पंढरपूर : उद्या पहाटे होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी अतिशय मोजक्या लोकांना प्रवेश दिला जाणार असून पूजेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुटुंबीय यांच्यासह मानाचे वारकरी दाम्पत्य आणि केवळ मोजके अधिकारी व पालकमंत्री कुटुंब अशा 25 व्हीआयपींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. उद्या पहाटे दोन वाजता अजित पवार सपत्नीक विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेसाठी येतील. यावेळी मंदिरात पहाटे दोन ते अडीच वाजेपर्यंत विठुरायाची महापूजा होणार असून यानंतर दोन वाजून 55 मिनिटापर्यंत रुक्मिणी मातेची महापूजा होईल. यानंतर 3 वाजून 15 मिनिटापर्यंत उपमुख्यमंत्री व मानाचा वारकरी यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने केला जाणार आहे.


अजित पवार जिथे पूजेचा संकल्प सोडतील त्या चौखांबीमध्ये अजित पवार कुटुंबासह केवळ पुजारी व मानाचे वारकरी अशा आठच लोकांना प्रवेश असेल तर पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मंदिर समिती सहअध्यक्ष व इतर असे एकूण 25 जणांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.


कार्तिकी सोहळ्यात कोरोनाच्या धोक्यामुळे मंदिर समिती अध्यक्ष, अधिकारी, पुजारी व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली असून मंदिरातही सारखे सॅनिटायझेशनचे काम केले जात आहे . कार्तिकी सोहळ्यानिमित्त पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी विठ्ठल मंदिराला फुलांची आरास केली असून या फुलांनाही सॅनिटाईझ करून घेण्यात आले आहे.


दरवेळी कार्तिकी महापूजेच्या वेळी दोनशे पेक्षा जास्त VIP गर्दी करीत असतात. मात्र यंदा उपमुख्यमंत्र्यांच्या पूजेत प्रशासनाच्या प्रोटोकॉल, पालकमंत्री आणि मानाचा वारकरी ठरलेले कवडूजी भोईर व त्यांच्या पत्नी कुसुमाबाई यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.





उपमुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान वर्धा जिल्ह्यातील कवडूजी भोईर यांना

यंदा कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत कार्तिकी एकादशीची महापूजा करण्याचे मान गेली 10 वर्षे विठ्ठल मंदिरात विना वाजवण्याची सेवा देणारे कवडूजी  भोईर यांना मिळाला आहे. सध्या कोरोनामुळे काळापासून द्वादशी पर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांना बंद असल्याने मंदिरातच सेवा देणाऱ्यातून चिट्ठी टाकून या मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. विठुरायाच्या सेवेमुळेच देवाने आपल्याला हा बहुमान दिल्याची प्रतिक्रिया कवडूजी भोईर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.  कवडूजी भोईर व त्यांच्या पत्नी कुसुमाबाई या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याच्या दौलापूर गावाचे रहिवासी आहेत.