मुंबई : कल्याणच्या वसार गावातल्या ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावात साध्या मूलभूत सुविधाही न आल्यानं ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.


अंबरनाथ तालुक्यातलं वसार गाव हे कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलं आहे. मात्र महापालिकेत येऊन देखील मागील पाच वर्षात गावात पक्का रस्ता, अंगणवाडी, शाळा, शौचालयं अशा साध्या आणि मूलभूत सुविधाही नाहीत.

शिवाय पिण्याच्या पाण्यासाठीही ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत आपण मतदान का करावं? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. याबाबत ग्रामसभा आयोजित करत लोकसभा निवडणुकीवर संपूर्ण गावाच्या वतीनं बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

यापुढे कुठल्याही निवडणुकीत कुठल्याच पक्षाला मतदान करायचं नाही, असं ग्रामस्थांनी जाहीर केलं आहे.