कल्याण: ज्या ठिकाणी नदी नसते त्या ठिकाणच्या नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. पण नदी काठी गाव असूनही त्या गावातील नागरिक जर पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत असतील तर? हीच अवस्था कल्याणमधील मानिवली गावातील नागरिकांची झाली आहे. उल्हास नदीच्या काठी असूनही या गावातील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावं लागतंय हे विशेष. 


कल्याण तालुक्यातील मानिवली गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. उल्हास नदी काठी असलेलं हे गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्याने 'नदी उशाला कोरड घशाला' अशी परिस्थिती या गावाची झाली आहे. शासनाकडून नागरिकाची तहान भागवण्यासाठी अनेक योजना आणल्या जातात. मात्र अनेक वर्षे पाठपुरावा करूनही एकही योजना या ग्रामस्थांच्या पदरी पडली नाही. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी या गावात बोअरिंग, विहिरीचं पाणी त्याच बरोबर थेट नदीतून पाणी टाकीत चढवले जाते. मात्र हे पाणी पिण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे ग्रामस्थाना तहान भागवण्यासाठी हंडा, कळशी, ड्रम घेत दोन किलोमीटरची पायपिट करावी लागत आहे. किती आमदार आले, खासदार आले, लोकप्रतिनिधींनी पाहणी केली, शासनाने आश्वासनं दिली, मात्र अद्याप पाणीप्रश्न काही सुटला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.


कल्याण तालुक्‍यात मानिवली या गावात सुमारे अडीच हजारच्या आसपास लोकसंख्या राहते. गावात एकूण पाचशे ते साडेपाचशे घरं आहेत. मानिवली ग्रामपंचायत या गावाचा कारभार पाहते. पाण्याबाबत च्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी नाही म्हणायला या गावात बोअरवेल, विहीर आहे. तसेच नदीचं पाणी टाक्यांमध्ये चढवलं जाते. मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने या ग्रामस्थांचे तहान मात्र अजूनही कायम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून पिण्याच्या पाण्यासाठी एखादी योजना देण्याची मागणी शासन दरबारी केली जात आहे. मात्र कागदी घोडे नाचवण्यापलिकडे काहीच कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. 


या गावातील ग्रामस्थ गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील मोहिली आदी गावांमध्ये जाऊन पिण्याचे पाणी भरतात कधी महिला हंडा डोक्यावर घेऊन जातात तर कधी पुरुष ड्रम गाडीला बांधून नेतात आणि भरून आणतात. उन्हाळ्यात तर अर्धा दिवस पिण्याचे पाणी भरण्यात जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत या गावचे सरपंच माया गायकर यांनी जल योजनेसाठी शासनाकडे कागदपत्रं सादर केली आहेत. यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्याप काहीच कारवाई झाली नाही.आम्ही निवडून आलो आहोत, मात्र शासन आम्हालाच दाद देत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. एकंदरीतच या जाचातून या ग्रामस्थांची सुटका कधी होणार, शासन काय निर्णय घेणार हे आता पाहावं लागणार आहे.