कल्याण : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपनं कंबर कसली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या लोकसभा मतदारसंघासह इतर 16 मतदारसंघात लक्ष केंद्रीत केलं आहे. या 16 मतदारसंघात कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. या लोकसभा मतदारसंघांत संघटनात्मक बांधणी, शत प्रतीशत भाजप यासाठी येत्या रविवारपासून माहिती प्रसारण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha constituency)  मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. भाजपने  16 मतदारसंघात कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवड केल्याने या मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. मात्र भाजपच्या या मिशनचे शिंदे पितापुत्र समर्थन करणार का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. 


2024 मध्ये होणाऱ्या  लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जे मतदारसंघ याआधी भाजपच्या वाट्याला आलेले नाहीत अशा महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे .या लोकसभा मतदारसंघात भाजपाचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत.  यात कल्याण लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. या मतदारसंघात भाजपाचा एक मोठा मतदार वर्ग आहे. प्रामुख्याने डोंबिवली शहरात भाजपच्या मतदारांची संख्या अधिक आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी संजय केळकर यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस दौरा करणार असल्याची माहिती दिली आहे


अनुराग ठाकूर  तीन दिवसात कल्याण लोकसभा ते पिंजून काढणार आहेत. या दौऱ्यात तळागाळातील कार्यकर्त्यांपासून जुन्या पदाधिकाऱ्यापर्यंत आणि  योजनेच्या लाभार्थ्यापासून नव्या मतदारांपर्यंत सर्वाशी चर्चा करत पक्षाचे मतदार वाढविण्याच्या दृष्टीने व्यूहरचना करणार आहेत. शत प्रतिशत भाजपा या उद्देशानेच हा दौरा असून वरिष्ठ स्तरावर या दौऱ्याचे नियोजन 6 महिन्यापूर्वीच करण्यात आले आहे. त्या नियोजनानुसार हा दौरा होणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. 


दरम्यान कल्याण लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ल्ला मानला जातो. सलग दोन वेळा या मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येणाऱ्या शिंदे यांचे या मतदार संघावर वर्चस्व आहे. छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी रात्री अपरात्री मतदार संघात फिरून डॉ. शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबध निर्माण केले आहेत. भाजपाचा पाठींबा मिळवत एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना कुणाची याबाबत न्यायालयीन लढा सुरु आहे. असे असताना डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात भाजपने लक्ष केंद्रित करत शत प्रतिशत भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.


राज्यात शिंदे फडणवीस सरकार असताना या मतदार संघात भाजपचा उमेदवार निवडून आणणार का या प्रश्नाला उत्तर देताना संजय केळकर यांनी बाजू सावरत केंद्र आणि राज्य स्तरावरील नेते निर्णय घेतील पण या लोकसभेत शत प्रतिशत भाजप झाली पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सरकार तर आता आलंय मात्र ही योजना आधीपासून सुरू आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे असे केळकर यांनी स्पष्ट केले